भाजप-शिवसेना संघर्ष दिल्लीत पोहोचला! BJP चं शिष्टमंडळ गृहसचिवांची भेट घेण्यासाठी राजधानीत, शिवसेनेची तक्रार करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 09:23 AM2022-04-25T09:23:27+5:302022-04-25T09:25:01+5:30
राज्यात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे.
नवी दिल्ली-
राज्यात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर भाजपाचं शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं आहे. सकाळी सव्वा दहा वाजता हे शिष्टमंडळ भल्ला यांची भेट घेणार आहे. गृह सचिवांकडून भाजपाच्या शिष्टमंडळाता १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं आहे. या शिष्टमंडळात किरीट सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे, आमदार मिहीर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह आणि विनोद मिश्रा यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर हे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
किरीट सोमैया मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपा चे शिष्टमंडळ दिल्ली साठी मुंबई हून रवाना, आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैया.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 25, 2022
नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना भेटणार.@BJP4Maharashtrapic.twitter.com/Y5CkefR6iN
केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीआधी किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "भाजपाचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरू केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला होतो. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत", असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड
खार पोलीस स्टेशनच्या आवारात माझ्यावर झालेला हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पॉन्सर्ड हल्ला होता, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितलं होतं. तरी त्यांनी जबाबदारी घेऊन मला तिथून सुरक्षित बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं. पण गेटमधून बाहेर येताच शिवसेनेचे ७० ते ८० गुंड माझ्या कारवर तुटून पडले होते. माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत मला तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.