भाजपच्या विरोधात लढणार शिवसेना
By admin | Published: September 16, 2016 12:57 AM2016-09-16T00:57:49+5:302016-09-16T00:57:49+5:30
भाजपबरोबर युती न करता भाजप विरोधकांशी हातमिळवणी करून उत्तर प्रदेश, गुजरात व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने चालवली आहे
सुरेश भटेवरा , नवी दिल्ली
भाजपबरोबर युती न करता भाजप विरोधकांशी हातमिळवणी करून उत्तर प्रदेश, गुजरात व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने चालवली आहे, अशी माहिती सेनेच्या विश्वासार्ह सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
उत्तर प्रदेशात जमिनीस्तरावर काम करून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम शिवसेनेने चालवले आहे. गुजरातमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे समर्थक असलेल्या हार्दिक पटेलांशी शिवसेनेची चर्चेची तयारी आहे तर गोव्यात संघाच्या राज्य प्रमुखपदावरून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकरांशी युती करण्याच्या चर्चेत उभयतांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. वेलिंगकरांना केवळ गोवाच नव्हे तर अन्य राज्यातील स्वयंसेवकांचाही पाठिंबा मिळतो आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर तर गोव्यात स्थानिक भाषेच्या मुद्यावर आगामी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेच्या विश्वासार्ह सूत्रांनी दिल्लीत व्यक्त केले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी मात्र या दोन राज्यात भाजपशी युती न करण्याचे अथवा उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला पाठिंबा देण्याचे यापैकी कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत किंवा या मुद्यावर अधिकृतरीत्या भाष्यही केलेले नाही.