शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:58 AM2022-07-29T11:58:00+5:302022-07-29T11:58:24+5:30
आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो असं अब्दुल सत्तार म्हणाले.
नवी दिल्ली- जालना येथील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना शिंदे गटात आणण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू आहेत. अब्दुल सत्तार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. मनधरणी करून खोतकरांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर खोतकरांचा शिंदे गटात समावेश अशा बातम्या आल्या त्यावर खोतकरांनी मी शिवसेनेतच असल्याचं सांगितले होते.
आज नवी दिल्लीत अब्दुल सत्तार यांनी खोतकरांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, अर्जुन खोतकर यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. ३१ तारखेला सिल्लोडच्या विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते आमच्यासोबत येतील. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो. अंतिम चर्चा आमच्यात व्हायची आहे. दानवे-खोतकर आणि आम्ही तिघे एकत्र येत पुढची राजकीय वाटचाल कशी असेल त्यावर चर्चा करू. अर्जुन खोतकर आणि आमची जवळीक आहे. कुठेतरी दोन पावलं मागे घेऊन पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठवाड्यात जागावाटप होतील त्यात शिंदे गट-भाजपा एकत्र येत चर्चा करतील. कुणालाही नुकसान नको आणि राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी खबरदारी घेऊ. मराठवाड्यात जे बोटावर मोजण्याइतके नेते आहेत त्यांच्यात अर्जुन खोतकर यांचं नाव आहे. विधानसभा, लोकसभेच्या जागावाटपात प्रामाणिकपणे एकमेकांना सहकार्य लागेल. राजकीय दक्षता घेऊनच काम करणार आहोत असंही सत्तारांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंशी बोलून अंतिम निर्णय घेणार
मित्र, भाऊ, सहकारी म्हणून निश्चितपणे मी त्यांच्यासोबत यावं अशी अपेक्षा आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केले आहे. माझ्या मनात जे काही होते ते मी आधीच सांगितले आहे. आज अब्दुल सत्तार आले त्यांच्याशी बोलणं झाले. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मी अंतिम निर्णय घेईन असं अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे.