दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले; दिल्लीला रवाना; ऑफर देणार की, स्वीकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:18 PM2022-06-24T16:18:36+5:302022-06-24T16:18:53+5:30
गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाजपाच्या गोटात शांतता होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. शिंंदेना ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज हॉटेलबाहेर पडले आहेत. संख्याबळ जमताच शिंदे यांनी गुवाहाटीहून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत.
शिंदे यांनी मातोश्रीविरोधात बंड पुकारत मी शिवसेनेतच असल्याचे म्हटले आहे. तसेच हिंदुत्व आणि बाळासाहेब हे आमची भूमिका आहे, असेही म्हणत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नाकारले आहे. असे असताना भाजपाचे नेते मात्र, गप्प आहेत. अशावेळी शिंदे यांना दिल्लीमधून ऑफर मिळाल्याचे समजते आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाजपाच्या गोटात शांतता होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. आजपर्यंत फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शिंदे गटाला आपल्याकडे वळविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यातच शिंदेंकडे शिवसेनाच नाही तर अपक्ष आमदारही असल्याने शिंदेंचे पारडे मजबूत झाले आहे.
अशातच भाजपाने एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर दिल्याचे समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना उप मुख्यमंत्री पद, ८ कॅबिनेट मंत्री पदे, ५ राज्य मंत्री पदे देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्रातही सत्तेत वाटा देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रात दोन मंत्री पदे देण्यात येतील. आता हा प्रस्ताव शिंदे स्वीकारणार की भाजपाला प्रस्ताव देणार हे लवकरच समजणार आहे.