बिहारच्या रणसंग्रामात शिवसेनेची उडी, भाजपाला आव्हान देणार
By admin | Published: September 13, 2015 06:07 PM2015-09-13T18:07:00+5:302015-09-13T18:07:00+5:30
बिहारमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच य रणसंग्रामात शिवसेनेनेही उडी मारली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - बिहारमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच य रणसंग्रामात शिवसेनेनेही उडी मारली आहे. शिवसेना स्वबळावर बिहारमधील निवडणूक लढवेल अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. नेमक्या किती जागावर शिवसेना उमेदवार उभे करेल हे थोड्याच दिवसांत स्पष्ट करु असेही त्यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये राजद, जदयू आणि काँग्रेसची महाघाडी व भाजपाप्रणीत एनडीए यांच्यात कांट की टक्कर सुरु असतानाच आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेना बिहार निवडणूक लढवणार असली तरी आम्ही भाजपासोबत ही निवडणूक लढवणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, एनडीएत आधीपासून भाजपासोबत मोठमोठी माणसं आहेत असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे हे स्वतः बिहारमध्ये प्रचारसभा घेतील, विकास व हिंदूत्व या दोन मुद्द्यांवलर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.