Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:02 AM2018-02-05T11:02:55+5:302018-02-05T15:13:21+5:30

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला.

Shiv Sena's Sanjay Raut comment on ceasefire violations by Pakistan | Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत

Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत

Next

नवी दिल्ली - पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले. हल्ल्यात बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चार जण जखमी झाले आहेत. भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याविरोधात संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

''शस्त्रसंधी उल्लंघनापेक्षा हे युद्धच आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर द्यायलं हवं'', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जर या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले गेले नाही तर भारताला जगामध्ये नामर्द म्हटले जाईल, असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केले आहे. 

''पाकिस्ताननं क्षेपणास्त्रानं आपल्यावर हल्ला केला आणि आपल्याकडील क्षेपणास्त्र केवळ राजपथावरील संचलन व शक्ती प्रदर्शनासाठीच आहेत का ?, 26 जानेवारीला परदेशातील प्रमुखांना दाखवण्यासाठीच आहेत का?'', असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. 



गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले.

पूंछ परिसरातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. जानेवारीत पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांचा मारा व गोळीबारामध्ये सात भारतीय जवान शहीद झाले होते व आठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय ७० जण जखमी झाले होते. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान पाकिस्तानी लष्कराने जम्मू, कठुआ, सांबा जिल्ह्यांतील सीमेवर तसेच पूंछ, राजौरी जिल्ह्यांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागात हल्ला केला होता.  

कॅप्टन कपिल कुंडू यांना वीरमरण
पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये कॅप्टन कपिल कुंडू तसेच रामअवतार, सुभम सिंह, रोशनलाल हे तीन जवान शहीद झाले. या शहीद जवानांपैकी दोघे जम्मू-काश्मीर, एक मध्य प्रदेशचा होता. कॅप्टन कपिल कुंडू यांचा १० फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. ते २३ व्या वर्षात पदार्पण करणार होते. वाढदिवसाच्या सहा दिवस आधीच कॅप्टन कुंडू यांना वीरमरण आले. हरियाणातील गुरगाव जिल्ह्यातील रणसिका गावचे ते मूळ रहिवासी होते.



 

मॉर्टेर्स बाँम्बचा मारा
पाकिस्तानने भारतीय लष्करावर अ‍ॅण्टी टँक गन मिसाइल, एलएमजी, मॉर्टेर्स बॉम्बचा मारा केला. पूंछ जिल्ह्यातील शाहपूर भागात पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये बीएसएफचा एक जवान व या भागातील इस्लामाबाद गावातील शाहनवाझ बानो व यासीन अरिफ ही दोन मुलेही जखमी झाली.

८४ शाळा ३ दिवस बंद
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या मा-यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या सुंदरबनी ते मांजाकोटे भागातील ८४ शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानी हल्ल्यात भारतीय लष्कराचा कॅप्टन व तीन जवान शहीद झाल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Shiv Sena's Sanjay Raut comment on ceasefire violations by Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.