शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केलं नाही, सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:29 AM2021-12-15T08:29:04+5:302021-12-15T08:38:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उत्कृष्ट संसदपटू खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. ईडी आणि सीबीआय या संस्थांकडून राज्यातील नेत्यांवर, त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईचा उल्लेख करत लोकसभेत आवाज उठवला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करत, केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला. सुप्रिया सुळेंनी त्याचाच संदर्भ देत लोकसभेतील पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान भाजपवर टिकास्त्र सोडले. शिवाजी महाराज हे अन्यायाविरुद्ध लढले. शिवरायांनी आपल्या लढाईत कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी-सीबीआयच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य केलं जात असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
.@supriya_sule Tai delivered a speech on demand for grants.
— NCP (@NCPspeaks) December 14, 2021
She expressed her disappointment on an MP selectively quoting on Chhatrapati Shivaji Maharaj. One of Shivaji Maharaj's qualities was he never attacked the families of his opponents & always protected the women. pic.twitter.com/lkdJ8C6dnz
छत्रपती शिवरायांनी नेहमीच महिला, मुलांचे संरक्षण केले. मात्र, ईडी, सीबीआयच्या छाप्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी श्रीमती खडसे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुटुंबीय यांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेखही आपल्या भाषणात केला. दरम्यान, 100 कोटींच्या वसुलीप्रकरणात सध्या अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी
भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली. या शहराचे महात्म्य आजही कायम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. तसेच, आक्रमकांनी काशीवर अनेक आक्रमणे केली. शहराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धर्मवेडाने झपाटलेल्या औरंगजेबाने तलवारीच्या धाकावर येथील संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती जगावेगळी आहे. येथे औरंगजेब आला तर त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराज या भूमीत जन्मतात, असे म्हणत छत्रपतींचा गौरवशाली इतिहास मोदींनी सांगितला होता.