प्रेरणादायी! शेतकऱ्याच्या लेकाची कौतुकास्पद कामगिरी, सिव्हिल जज होऊन नेत्रदीपक भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:11 PM2022-05-04T14:11:53+5:302022-05-04T14:13:25+5:30
Shivkant Kushwaha : घरची परिस्थिती हलाखीची असल्याने भाजी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही आणि सिव्हिल जज झाले.
नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतपकास्पद घटना आता समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर उंच भरारी घेतली आहे. शिवकांत कुशवाहा (Shivkant Kushwaha) असं या व्यक्तीचं नाव असून त्यांची आई शेतीत मजुरीचे काम तर वडील शेतकरी आहेत. ते स्वतः देखील आधी भाजी विकण्याचं काम करायचे. यानंतर आता ते सिव्हिल जज या पदापर्यंत पोहोचले आहेत. सर्वत्र शिवकांत यांचं भरभरून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवकांत कुशवाह यांचे कुटुंब आजही कच्च्या घरात राहतात. त्यांचे वडील मजूर आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी कष्ट करून कुटुंबाचे पालनपोषण केले. त्याची आईही घर चालवण्यासाठी काम करायची. शिवकांतला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची प्रचंड आवड होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही आणि सिव्हिल जज झाले.
सिव्हिल जज झालेल्या शिवकांतचे वडील कुंजी लाल कुशवाह यांची छोटीशी शेती आहे. ते येथे भाजीपाला पिकवतात आणि विकतात. संघर्षाच्या दिवसांत तेही वडिलांसोबत भाजी विकण्यासाठी बसायचे. आईच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था आणखी बिकट झाली. शिवकांतला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. त्यामुळे त्यांनी कधीच आपलं शिक्षण थांबवलं नाही. एवढेच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते उसाच्या रस देखील विकायचे.
शिवकांत चार वेळा अपयशी ठरले, तरीही त्यांनी हार मानली नाही. पाचव्या प्रयत्नात यश मिळाले आणि त्यांनी ओबीसी प्रवर्गात दुसरे स्थान मिळविले. शिवकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथपर्यंत पोहोचण्यासाठी दररोज 12 तास अभ्यास केला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण अमरपाटण येथेच घेतले. त्यानंतर रीवा येथून एलएलबी केले. त्यानंतर अभ्यासासोबत कोर्ट प्रॅक्टिस करून न्यायाधीशांच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि मेहनतीने यश संपादन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.