शिवपाल यांचा राजीनामा
By admin | Published: September 16, 2016 02:17 AM2016-09-16T02:17:02+5:302016-09-16T02:17:02+5:30
शिवपाल यादव यांनी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या अन्य सर्व पदांसह मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे
लखनौ : शिवपाल यादव यांनी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या अन्य सर्व पदांसह मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. शिवपाल यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा आणि मंत्रिपदाचाही राजीनामा मुलायमसिंग यांच्या सुपूर्द केला. त्यांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतरही शिवपाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय पेच आणखीनच चिघळला आहे.
शिवपाल यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरताच त्यांचे समर्थक रात्रीच त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि ‘शिवपाल आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ चे नारे लावले.
विशेष म्हणजे शिवपाल यांचे चिरंजीव आदित्य यांनी प्रादेशिक को. आॅप. फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यापाठोपाठ पत्नी सरला यांनीे इटावा जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आतापर्यंत घरातील वाटणारे हे भांडण आता रस्त्यावर आले आहे.
तत्पूर्वी गुरुवारी सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी सायंकाळी तातडीने नवी दिल्लीहून लखनौला धाव घेत पुत्र अखिलेश आणि भाऊ शिवपाल यादव यांच्याशी बंदद्वार चर्चा करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुलायमसिंग यांनी लखनौला येताच सपा परिवारात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच मुलायमसिंग हेही अखिलेश यांना भेटले.
या भेटीत मुलायमसिंग यादव यांनी शिवपाल यांची आधीची सर्व खाती परत करण्याची सूचना अखिलेश यांना केली होती मात्र त्यांनी ती फेटाळून लावली तसेच शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यासह विरोध केला होता. अखिलेश यांनी नमते न घेतल्यामुळे अखेर शिवपाल यांनी दोन्ही पदांवरून पायउतार होत राजीनामे सुपूर्द केले. शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी मुलायमसिंग यांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. रात्री वेगाने घडलेल्या या घडामोडींमुळे समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे.