शिवराजसिंह चौहान यांनी उपोषण सोडले
By admin | Published: June 12, 2017 12:00 AM2017-06-12T00:00:54+5:302017-06-12T00:00:54+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपले उपोषण सोडले.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपले उपोषण सोडले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या. राज्यात आधारभूत दरापेक्षा कमी दरात शेतमाल विकणे हा गुन्हा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांनी चौहान यांना नारळाचे पाणी देऊन उपोषण सोडले.
याबाबत बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, २००२ मध्ये आलेल्या स्वामीनाथन समितीच्या अहवालाबाबत मी अभ्यास केला. या अहवालाच्या शिफारशीनुसार अनेक निर्णय घेतले. दलालांना बाजूला करण्यासाठी राज्यात सर्व नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात ‘किसान बाजार’सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. शेतमालाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी १००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांची जमीन संपादीत केली जाणार नाही. आदिवासींना त्यांच्या ताब्यातील काही जमीन देण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांचे उपोषण म्हणजे नाटक असल्याचे काँग्रेसने कालच म्हटले होते. मंदसौर येथील गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही चौहान म्हणाले.
मंदसौरच्या काही भागातील संचारबंदी हटविली
मंदसौरच्या तीनही पोलीस ठाण्यांतर्गतची संचारबंदी रविवारी हटविण्यात आली. पिपलीमंडी भागातील संचारबंदी मात्र कायम आहे. जिल्हाधिकारी ओ.पी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, आज परिस्थिती शांत आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना नाही.
योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह ३० जणांना ताब्यात घेतले
मध्य प्रदेश पोलिसांनी रविवारी योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि स्वामी अग्निवेश यांच्यासह ३० कार्यकर्त्यांना रतलाम जिल्ह्यात ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते जात होते.