...तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 11:47 AM2019-06-06T11:47:35+5:302019-06-06T11:48:18+5:30
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्लीः शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. लोकसभा नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे आता राम मंदिराचं काम मार्गी लागेल, अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली. मला असं वाटतं आता राम मंदिराच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. पण जर असं झालं नाही, तर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
भाजपाकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेकडे 18 खासदार आहेत. तर एनडीएकडे 350हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवं आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा दावा आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: I feel this time around Ram temple's construction will start because if we don't, the country will stop trusting us. Now BJP has 303 MPs, Shiv Sena has 18, NDA has more than 350, what more is needed to construct the temple? pic.twitter.com/GtMGGlc5qy
— ANI (@ANI) June 6, 2019
तर दुसरीकडे हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे, लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याचा अंदाज बांधला जात होता. पण शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे साहजिकच भावना गवळी नाराज झाल्याचीच चर्चा होती.