उद्धव ठाकरेंचा फोन गेला अन् मोदींच्या उपोषणातून अनंत गीतेंनी गाशा गुंडाळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 12:43 PM2018-04-12T12:43:02+5:302018-04-12T12:43:02+5:30
सामनामधून उपोषणावर टीका होत असताना गीते उपोषणात सामील झाले होते
नवी दिल्ली: एकीकडे 'सामना'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपोषणावर टीका होत असताना, दुसरीकडे शिवसेना नेते अनंत गीते भाजप खासदारांसोबत उपोषण करताना दिसले. गीते भाजपच्या खासदारांसोबत उपोषण करताना दिसल्यानं शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गीते यांना तातडीनं उपोषणस्थळ सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे गिते यांनी उपोषणस्थळावरुन काढता पाया घेतला. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या उपोषणाबद्दलची शिवसेनेची नेमकी भूमिका काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्याच्या निषेधार्थ भाजपकडून उपोषण करण्यात येतं आहे. पंतप्रधान मोदींनी याबद्दलची घोषणा केली होती. खुद्द पंतप्रधान मोदी दिल्लीत स्वपक्षीय खासदारांसह उपोषण करणार आहेत. याच मंचावर शिवसेना खासदार अनंत गीते उपस्थित होते. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं आजच्या अग्रलेखातून मोदींच्या उपोषणावर तोंडसुख घेतलं असताना गीते उपोषणात सहभागी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं.
'सामना'मधून उपोषणावर टीका झाली असताना तुम्ही उपोषणात सहभागी कसे झालात, असा प्रश्न गीतेंना विचारण्यात आला. यावर बोलताना, 'मी शिवसेनेचा खासदार म्हणून नव्हे, तर मोदी सरकारचा भाग म्हणून उपोषणात सहभागी झालो आहे,' असे गीतेंनी म्हटले. सामनाला भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यामुळे शिवसेनेत मोठी नाराजी होती. याशिवाय शिवसेनेच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्हदेखील निर्माण झालं होतं. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गीतेंना फोन करुन उपोषणस्थळ सोडण्याचे आदेश दिले. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये गीतेंनी उपोषणस्थळावरुन काढता पाय घेतला.