शिवसेना नरमली, उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित
By admin | Published: October 31, 2014 03:16 PM2014-10-31T15:16:13+5:302014-10-31T17:43:39+5:30
भाजपाकडून अमित शहा, अरुण जेटली यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - सन्मान मिळत नसल्याने भाजपाप्रणित सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणा-या शिवसेनेने शुक्रवारी नरमाईची भूमिका घेतली. भाजपाकडून अमित शहा, अरुण जेटली यांनी फोन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
गुरुवारी शिवसेनेने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील दुरावा आणखी वाढल्याचे दिसत होते. अखेरीस शुक्रवारी दुपारी दिल्लीवरुन सूत्रं हलली आणि शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करुन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केल्यावर उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. यामुळे शिवसेनेच्या बहिष्कार नाट्यावर पडदा पडला. उद्धव ठाकरे सपत्नीक या सोहळ्याला हजर असल्याने भाजपाला दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेची नाराजी दूर झाली असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाने शपथविधी सोहळ्यात मंचावर बसणार नाही अशी भूमिका घेतली. पहिल्या टप्प्यात रासपला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. आम्ही भीक मागून आणि स्वाभिमान गहाण ठेऊन भाजपाच्या मागे फिरणार नाही असे त्यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे.