नवरात्रीला मांसविक्री करणा-या 500 दुकानांना शिवसेनेनं ठोकलं टाळं, नवरात्री संपेपर्यंत विक्री न करण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 01:16 PM2017-09-22T13:16:52+5:302017-09-22T13:19:07+5:30
हरियाणामधील गुरुग्राम येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणा-या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. शिवसेनेने मांस आणि चिकनविक्री करणारी 500 दुकाने बंद केली आहेत.
गुरुग्राम - हरियाणामधील गुरुग्राम येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणा-या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. शिवसेनेने मांस आणि चिकनविक्री करणारी 500 दुकाने बंद केली आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते गुरुवारी पालमविहार येथे जमा झाले होते. यानंतर त्यांनी सूरतनगर, अशोक विहार, सेक्टर क्रमांक पाच आणि नऊ, पटौदी चौक, सदर बाजार, खांडसा धान्यबाजार, बस स्टॅण्ड, डीएलएफ, सोहना आणि सेक्टर 14 मधील मांसविक्रीची दुकानं बंद करुन टाकली.
गुरुग्राम युनिटचे महासचिव व प्रवक्ता ऋतूराज यांनी सांगितलं आहे की, आम्ही मांस आणि चिकनचं प्रत्येक दुकान बंद व्हावं यासाठी आधीच नोटीस बजावली होती. ते बोलले आहेत की, 'आम्ही यावेळी चिकन ऑफर करणा-या रेस्टॉरंट आणि इतर फूड चेन्सला कोणतीही नोटी दिलेली नाही. जर कोणी आदेशाचं पालन केलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'. शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणा-या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही तोपर्यंत आपली दुकानं बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे.
Had given memorandum to Gurugram admin demanding shutting down of illegal meat shops in view of Navratri-Ritu Raj (Shiv Sena spox, Gurugram) pic.twitter.com/DgVvm2b1D0
— ANI (@ANI) September 22, 2017
ऋतूराज यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'आम्ही मंगळवारी गुरुग्रामचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांना अर्ज देत पुढील नऊ दिवस मांसविक्री करणारी दुकानं बंद करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने ही दुकानं बंद ठेवण्याचा कोणताच आदेश दिला नाही'. 'गुरुग्राममधील 50 टक्के दुकानं आधीच बंद होती, आणि जी सुरु होती ती आम्ही बंद करायला लावली', अशी माहिती ऋतूराज यांनी दिली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. कोणालाही कायदा हातात घेण्याचा हक्क नाही'. जर शिवसेना कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकानं बंद केली तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी तक्रार दाखल होण्याची वाट आम्ही पाहत आहोत असं ते बोलले आहेत.
50% of shops in Old Gurugram were already closed, those open were made to close by us: Ritu Raj (Shiv Sena spokesperson, Gurugram wing) pic.twitter.com/Px3dMeEgOR
— ANI (@ANI) September 22, 2017
विशेष म्हणजे मुंबईत पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी आणण्याच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला होता. पर्युषण काळात एकीकडे मांसविक्रीवर बंदी आणण्याला विरोध करायचा, आणि नवरात्रीला मांसविक्री करण्याची मागणी करत दुकानं बंद केल्याने शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर येत असल्याची टीका विरोधक करत आहेत.