शिवसेनेकडून अद्याप नावाचा प्रस्ताव नाही
By admin | Published: May 21, 2015 02:48 AM2015-05-21T02:48:04+5:302015-05-21T02:48:04+5:30
बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.
सुरेश प्रभू : वांद्रे टर्मिनसला बाळासाहेबांचे नाव दिल्यास आनंदच !
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबईच्या वांद्रे टर्मिनसला देण्यासाठी आक्रमक मागणी केलेल्या शिवसेनेने किंवा पालिका स्तरावर अशाच मागणीची भाषा वापरणाऱ्या मनसेने त्यासाठी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, की रेल्वे स्थानकांना नाव देण्याबाबत गृह मंत्रालय निर्णय घेते. तिथेच प्रस्ताव येतो. मुळात कोकणातून आणि शिवसेनेतून राजकारणात आलेल्या पण आता भाजपात असलेल्या प्रभू यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे, असा शिवसेनेशी विसंगत पवित्रा घेतला. अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांचे हाल मला माहीत आहेत
मुंबईकरांचे हाल मला माहीत आहेत. त्यांना फक्त दिलासा नको, कृती हवी असल्याने मी काम सुरू केले. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा आधुनिक केली जात आहे. त्याचा आठवडी अहवाल मी घेत असतो. रेल्वे फलाट व डब्यांची उंची एकसारखी करणे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची योजना आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जपानच्या सहयोगाने अभ्यास पूर्ण झाला आहे असून, या मार्गावर हाय स्पीड रेल्वेसाठी आता काहीच अडचण नाही. तीन-साडेतीन वर्षांत हा मार्ग प्रत्यक्षात येण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे केवळ स्वप्न आहे, असे समजू नये.
पुणे व नागपूर मेट्रोचा विषय राज्य सरकार व केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाशी संबंधित आहे. रेल्वे मंत्रालयाचा फार संबंध या प्रकल्पांशी नाही. पण माझे अनुकूल मत त्यांना दिले आहे. वर्षअखेर हे दोन्ही प्रकल्प गती घेतील, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
स्मार्ट स्टेशन्स ही तर नावीन्यपूर्ण योजना आहे. मुंबईतील अंधेरी, दादर, ठाणे या स्थानकांचा लखलखता विकास येत्या तीन वर्षांत झालेला असेल. शिवाजीनगर, नागपूरचाही विकास याचबरोबरीने केला जाईल. तर वांद्रे स्थानकाचा हेरिटेज स्थानक म्हणून विकास व जोपासना केली जाणार आहे.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्याच्या मागणीवरून आणि त्यासाठी आक्रमक होण्याऐवजी राज्य सरकारबरोबर सामोपचाराची, शिवसेनेच्या स्वभावाशी विसंगत भूमिका घेण्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले होते. -विशेष