विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजानं ‘तोफ’ का थरथरली? शिवसेनेचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 08:31 AM2019-01-21T08:31:15+5:302019-01-21T08:34:52+5:30

पंतप्रधानांनी जुमलेबाजीतून बाहेर पडावं; शिवसेनेचा मोदींना सल्ला

shivsena take a dig at pm modi after he criticizes opposition maha rally in kolkata | विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजानं ‘तोफ’ का थरथरली? शिवसेनेचा मोदींना सवाल

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजानं ‘तोफ’ का थरथरली? शिवसेनेचा मोदींना सवाल

Next

मुंबई: मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? 22 विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली? असे प्रश्न शिवसेनेने पंतप्रधानांना विचारले आहेत. मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. 22 पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. 

ममता बॅनर्जींच्या व्यासपीठावर काल जे गेले ते सगळे लोकविरोधी, देशविरोधी किंवा चोर आहेत असे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बजावले आहे. विरोधकांची आघाडी पंतप्रधान मोदी यांनी इतकी मनावर घेण्याचे कारण नाही व ते सर्व एकत्र आले म्हणून त्यांची ‘लोकविरोधी’ ‘देशविरोधी’ अशी खिल्लीही उडविण्याचे कारण नाही. विरोधकांच्या महाआघाडीत असे अनेक चेहरे-मोहरे आहेत की, जे वाजपेयी व मोदींच्या राष्ट्रीय आघाडीत सामील झाले होते. स्वतः ममता बॅनर्जी वाजपेयी सरकारात मंत्री होत्या. चंद्राबाबू नायडू, डी.एम.के., फारुख अब्दुल्ला, शरद यादव, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, गेगाँग अपांग हे लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येत-जात राहिलेच आहेत. खुद्द मायावती यांनी भाजपला साथ दिली आहे. हे सर्व लोक तेव्हा देशविरोधी नव्हते, पण आज देशाचे शत्रू बनले. नितीशकुमार यांनी मोदी यांची साथ सोडली तेव्हा तेसुद्धा देशविरोधी झाले व पुन्हा त्यांनी मोदींना टाळी दिली तेव्हा तेच नितीशकुमार देशप्रेमी झाले. देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीने या जुमलेबाजीतून बाहेर पडले पाहिजे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदींचा समाचार घेतला आहे.

लोकशाहीत विरोधी आघाडीस महत्त्वाचे स्थान आहे व विरोधकांचा भडीमार पंतप्रधानांनी संयमाने सहन केला पाहिजे. मोदींचे सरकार हे काही देशाचे शत्रू नाही, पण आपले सरकार ‘अमर’ आहे या भ्रमातही त्यांनी राहू नये. निवडणुका लढवून जिंकण्याचा व सत्ता टिकविण्याचा त्यांना अधिकार आहे तसा सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करून त्यांना पराभूत करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. सर्व काही जनता ठरवते. कालच श्री. मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

जम्मू-कश्मीरात भारतीय जनता पक्षाने लोकविरोधाची पर्वा न करता मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संधान बांधून सत्ता भोगली. सरकार त्यांनीच पाडले व मेहबुबा यांची भूमिका लोकविरोधी, देशविरोधी असल्याचा डांगोरा पिटायला सुरुवात केली. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. 22 पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या. हे चित्र लोकशाहीला बरे नाही, पण सत्ताधारी बेभान झाले की, जे घडते तेच घडताना आम्ही पाहात आहोत, असं म्हणत शिवसेनेने मोदींवर शरसंधान साधलं आहे.
 

Web Title: shivsena take a dig at pm modi after he criticizes opposition maha rally in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.