Shivsena: सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही, शिवसेनेनं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 08:52 AM2022-08-16T08:52:17+5:302022-08-16T08:55:28+5:30
मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे.
मुंबई - शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आपलं मत व्यक्त केलं. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना देशातील दोन समस्यांना संपवायचं असल्याचं म्हटलं. त्यात, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला संपवून टाकायचं आहे. ज्यांनी देशाला लुटलं त्या लुटणाऱ्यांकडून आता लुटलेला माल परत घ्यायची वेळ आलीय, असेही मोदींनी म्हटले होते. त्यानंतर, शिवसेनेकडून यावर जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलेल्या मुलाखतीत मोदींचे भाषण आणि स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही महात्मा गांधींचा तिरस्कार करुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गोडसेंवर लक्ष केंद्र करता. पण, हा देश महात्मा गांधींच्या ऊर्जेवर आणि त्यांच्या तत्वानेच चालत आला आहे. जर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महात्मा गांधींचं नाव घेत असतील, तर तेही गांधींचाच मार्ग अवलंबत असतील, अशी मला आशा आहे, असेही चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देशाच्या उभारणीत अनेक कुटुंबांचं योगदान आहे. त्यामध्ये, स्वातंत्र्य सैनिक, सैन्यदल, न्यायालयीन, प्रशासकीय अधिकारी यांसह अनेक परिवारांनी आपलं योगदान दिलं आहे. नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे गांधी परिवारावर केलेल्या टिकेला प्रियंका यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.
सावरकराचं योगदान दुर्लक्षित करता येणे नाही
स्वातंत्र्य लढ्यातील विनायक दामोदर सावरकर यांचंही योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष लक्षवेधी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं आहे. म्हणूनच, सावरकरांचही महत्त्व दुर्लक्षित होता येणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.