'व्हॅलेंटाइन डे'च्या विरोधात शिवसैनिकांनी केलं काठ्यांचं पूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 03:36 PM2018-02-12T15:36:50+5:302018-02-12T16:22:23+5:30
व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्यासाठी शिवसेनेने नुकतीच काठ्यांची पूजा केली. जो कोणी व्हॅलेंटाइन डे साजरा करेल त्याला काठ्यांचा प्रसाद देण्यात येईल असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.
लखनऊ - एकीकडे व्हॅलेंटाइन डे'ची तयारी सुरु असताना उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये शिवसेना मात्र विरोध करण्यासाठी सज्ज आहे. व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्यासाठी शिवसेनेने नुकतीच काठ्यांची पूजा केली. जो कोणी व्हॅलेंटाइन डे साजरा करेल त्याला काठ्यांचा प्रसाद देण्यात येईल असा इशाराच शिवसेनेने दिला आहे. 14 फेब्रुवारीला संपुर्ण जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी तर प्रेमी युगूल हा दिवस एकत्र घालवत नातं घट्ट करण्यासाठी एकमेकांना भेटत असतात. मॉल, रेस्टॉरंट आणि गार्डन अशा अनेक ठिकाणी या दिवशी प्रेमी युगूलांची गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
शिवसेनेच्या मुझफ्फरनगरमधील शाखेने मात्र जर त्या दिवशी कोणी एकत्र दिसलं तर त्याने मार खायला तयार राहावं असा इशारा दिला आहे. काठ्यांची पूजा करणा-या शिवसैनिकांचं म्हणणं आहे की, 'व्हॅलेंटाइन डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या संस्कृतीचा अशाप्रकारे नाश होताना पाहू शकत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हाला वर्षाचे 365 दिवस असताना याचदिवशी नेमकं हे सगळं का करायचं असतं'.
मुझफ्फरनगरमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या विरोधात काठ्यांची पूजा करणा-या शिवसैनिकांचं हेदेखील म्हणणं आहे की, या दिवशी काहीजण तरुणींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. असे लोक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून अश्लील कृत्य कऱण्याचा प्रयत्न करतात. शिवसैनिकांनी तर हादेखील दावा केला आहे की, 'व्हॅलेंटाइन डेच्या बहाण्याने लव्ह जिहादला खतपाणी मिळत आहे'.
रविवारी व्हॅलेंटाइन डेच्या विरोधात शिवसैनिकांनी काठी पूजनचा कार्यक्रम ठेवला होता. काठ्यांची पूजा केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाइन डे साजरा न करण्याची धमकी दिली. जो कोणी व्हॅलेंटाइन डे साजरा करेल, त्याला काठ्यांचा चोप देण्यात येईल अशी खुली धमकीच शिवसेनेने दिली आहे.
कार्यकर्त्याला दोन वर्षांपूर्वी पक्षातून काढलं आहे, आमची अधिकृत भूमिका नाही
मात्र धमकी देणा-या शिवसेना कार्यकर्त्याला दोन वर्षांपूर्वीच पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे ही आमची अधिकृत भूमिका नसून पक्षाशी काहीही संबंध नाही अशी माहिती शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी दिली आहे.