जनतेची दिशाभूल करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न
By admin | Published: October 6, 2016 10:23 PM2016-10-06T22:23:44+5:302016-10-07T00:07:04+5:30
नीलेश राणे : जैतापूर प्रकल्पाविरोधी आंदोलनाबाबत खासदार विनायक राऊतांवर टीका
नीलेश राणे : जैतापूर प्रकल्पाविरोधी आंदोलनाबाबत खासदार विनायक राऊतांवर टीका
राजापूर (जि.रत्नागिरी) : जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा असे खासदार विनायक राऊत यांना वाटत असेल, तर त्यांनी संसदेत चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधावे. पण शिवसेनेला तसे करायचे नसून, जनतेची दिशाभूल करून आगामी निवडणुकीत आपली पोळी भाजायची आहे, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी राजापुरात पत्रकार परिषदेत केली.
जैतापूर प्रकल्पांतर्गत सुमारे ९० टक्के प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडून भरपाई घेतली आहे. तरीही नाहक विरोध दाखविला जात आहे. सध्या प्रकल्पस्थळावरील सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. शिवसेनेला मात्र राजकारण करायचे असून, आगामी निवडणुकांवर डोळा ठेऊनच सारे चालले आहे, असा आरोप करीत राणे यांनी शिवसेना खा. विनायक राऊत, आमदार राजन साळवी व माजी आमदार गणपत कदम यांना लक्ष्य केले. (प्रतिनिधी)
आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल, असे नीलेश राणे यांनी सांगितले.