शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:03 AM2019-08-13T01:03:16+5:302019-08-13T06:40:15+5:30
शोभा डे यांनी पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे
मुंबई - प्रसिद्ध भारतीय लेखिका शोभा डे यांनी आपल्या सांगण्यानुसार काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या कलाने लेख लिहिला होता, असा दावा पाकिस्तानचेभारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला होता. दरम्यान, बासित यांचा दावा शोभा डे यांनी फेटाळून लावला आहे. बासित यांचे वक्तव्य धोकादायक आणि दुर्भावनेने प्रेरित असल्याचा टोला शोभा डे यांनी लगावला आहे.
अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावताना शोभा डे म्हणाल्या की, ''मी एक देशभक्त भारतीय नागरिक आहे. बासित यांनी केलेल्या आरोपांमुळे अपमानित झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.'' अब्दुल बासित हे 2014 मध्ये भारतात उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले होते.
#WATCH Columnist Shobhaa De responds to claims by Former Pakistan High Commissioner to India, Abdul Basit, that he managed to influence her writings on Kashmir pic.twitter.com/784dub1wBW
— ANI (@ANI) August 12, 2019
बासित अली यांनी हल्लीच ट्विटरवर एक व्हिडीओ इंटरव्ह्यू शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, '' 2016 मध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये आंदोलकांविरोधात पॅलेट गनचा वापर आणि आर्थिक नाकेबंदी करण्यात येत होती. मात्र भारतीय पत्रकारांकडून याबाबत फार काही लिहिले जात नव्हते. त्यावेळी कुठल्याही भारतीय पत्रकाराला काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराच्या बाजूने लिहिण्यास राजी करणे आव्हानात्मक होते. मात्र शोभा डे यासाठी राजी झाल्या. त्यानंतर त्यांनी एका लेखात लिहिले की काश्मीर प्रश्नावर सार्वमत घेऊन हा प्रश्न कायमचा सोडवण्याची वेळ आली आहे.''
मात्र बासित अब्दुल यांच्या दाव्यामुळे शोभा डे यांचा तीळपापड झाला आहे. ''मी सहजा अशा वक्तव्यांबाबत प्रतिक्रिया देत नाही. मात्र आता खोट्याला उघडे पाडण्याची वेळ आली आहे. विशेषकरून हा दावा अशा नीच व्यक्तीने केला आहे जो केवळ मलाच नाही तर माझ्या देशाला बदनाम करू इच्छित आहे.''