देशाला धक्के
By admin | Published: April 26, 2015 02:13 AM2015-04-26T02:13:55+5:302015-04-26T02:13:55+5:30
राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात उच्च तीव्रतेचा भूकंप आल्याने लोक घाबरून आपापल्या कार्यालयातून बाहेर पडले.
दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात उच्च तीव्रतेचा भूकंप आल्याने लोक घाबरून आपापल्या कार्यालयातून बाहेर पडले. मेट्रो सेवाही विस्कळीत झाली. परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली नसली तरी तिचा वेग कमी करून मर्यादित करण्यात आला. यामुळे विलंब झाला. मेट्रो लाइनचे कुठलेही नुकसान झाले नाही. काही भागात भिंतींना भेगा पडल्या. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी त्वरित संयुक्त पोलीस आयुक्त, दिल्लीचे गृहसचिव आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
राजस्थान : राजस्थानात जयपूर, झुंझनू, अजमेर, सिकर आणि बुंदीमध्ये भूकंपाचे किरकोळ धक्के अनुभवले. दहशतीमुळे अनेक भागांत लोक घराबाहेर पडले. परंतु राज्यात कुठल्याही प्रकारच्या जीवहानीचे वृत्त नाही.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह बहुतांश भागात आलेल्या भूकंपात किमान १२ जण ठार तर २० जखमी झाले. सर्वच जिल्हे भूकंपाने हादरले. हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी ३० सेकंद आणि १२ वाजून १५ मिनिटांनी १० सेकंदाचा धक्का बसला. बाराबंकीच्या मोहंमदपूर खाला पोलीस स्टेशनअंतर्गत वसंतापूर गावात एका निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याने तीन जण ठार, तर अन्य आठ जखमी झाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भूकंपानंतर तातडीने सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले. तसेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना परिस्थितीचा आढावा घेऊन भूकंपग्रस्तांसाठी त्वरित मदत आणि बचावकार्य सुरू करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. भूकंपाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना २० हजारांची मदत त्यांनी जाहीर केली.
राष्ट्रीय राजधानीला लागून असलेल्या नोएडात काही उंच इमारतींना भेगा पडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. गोरखपूरच्या ठाकूरपूरमध्ये भिंत कोसळून एका अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. छावणी ठाण्याअंतर्गत मोहद्दीपूर भागात एका शाळेचे छत कोसळल्याने एक विद्यार्थी ठार, तर चौघे जखमी झाले. एक महिला छतावरून उडी घेतल्याने जखमी झाली. मथुरेतही राया, नंदगाव, बरसाना आदी भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.
कोची
केरळात कोचीच्या काही
भागात सौम्य धक्के बसल्याने लोकांमध्ये दहशत पसरली
होती. एर्नाकुलमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. रामचंद्रन यांनी सांगितले की, या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर एवढी होती.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशच्या अनेक भागांत भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घरे, कार्यालये आणि प्रतिष्ठानांमधून बाहेर पडले. परंतु राज्यात कुठेही जीवहानी झाली नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार भोपाळसह मध्य प्रदेशातील जबलपूर, छिंदवाडा, सीधी, शहडोल, मंडला, होशंगाबाद, मुरैना, ग्वाल्हेर आदी शहरांमध्ये सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास २० ते २५ सेकंद हे धक्के जाणवले.
झारखंड : झारखंडमध्ये दुमका, पाकुड, साहिबगंज, रांची, जमशेटपूर आणि अन्य काही भागात सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी धक्का बसला. मात्र कुठलीही हानी झाली नाही.
आंध्र प्रदेश : तटवर्तीय आंध्र प्रदेशातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परंतु कुठलेही नुकसान मात्र झाले नाही. चक्रीवादळ इशारा केंद्रानुसार विशाखापट्टणम, श्रीकाकुलम आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यात काही सेकंद हादरे जाणवले.
ओडिशा : भूकंपामुळे ओडिशातही दहशतीचे वातावरण पसरले होते, मात्र कुठलीही हानी झाली नाही. भूवनेश्वर येथून प्राप्त वृत्तानुसार याची तीव्रता ७.५ रिश्टर एवढी होती. राजधानी भूवनेश्वरव्यतिरिक्त कटक, बालेश्वर, जगतिसिंहपूर, भद्रक, केंद्रपाडा, मयूरभंज, ब्रह्मपुरी, खुर्दा आणि संबलपूरमध्ये जवळपास २० सेकंद ते १ मिनिट भूकंपाचे धक्के बसले.
पंजाब,
हरियाणा
पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले, परंतु कुठलेही नुकसान झाले नाही.
उत्तराखंड
उत्तराखंडच्या नैनिताल आणि पिथौरागडमध्ये लोकांनी भूकंपाचे धक्के अनुभवले. हवामान विभागाचे महासंचालक एल.एस.राठोड यांच्या सांगण्यानुसार, भारत-नेपाळ सीमेलगत गोरखपूरमध्ये ६.५ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. तर पाटणा, वाराणसी आणि अलाहाबादमध्ये त्याची तीव्रता ६ रिश्टर होती.
सिक्कीम
सिक्कीममध्ये भूकंपामुळे अनेक भागांत कडे कोसळले. परंतु कुठल्याही प्रकारच्या जीवहानीची सूचना नाही. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार सिक्कीममध्ये गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे किरकोळ धक्के जाणवत आहेत.
भूकंप - दूरसंचार
सेवा उद्ध्वस्त
बिहार आणि उत्तर प्रदेशात भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे दूरसंचार सेवेला मोठा फटका बसला. संपर्क व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्वरित दूरसंचार विभागाला या दोन्ही राज्यांमध्ये भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या दूरसंचार सेवेचा आढावा घेऊन लवकरात लवकर ती सुरळीत करण्याचे आदेश दिले. याशिवाय बीएसएनएलच्या मुख्य महाव्यवस्थापकांना झालेले नुकसान आणि यामुळे फटका बसलेल्या भागाची सविस्तर माहितीही एकत्रित करण्यास सांगण्यात आले.
ईशान्य भारत
मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आसामची राजधानी गुवाहाटी आणि काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातही त्याचा प्रभाव जाणवला.
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील संपूर्ण क्षेत्रात भूकंपाचे धक्के बसले. अनेक इमारतींच्या भिंती दुभंगल्या. यात ३ व्यक्ती ठार, तर ४० शाळकरी विद्यार्थ्यांसह किमान ६९ लोक जखमी झाले. जलपाईगुडीचे जिल्हाधिकारी पृथा सरकार यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या अंबरी भागात नोआपाडामध्ये पन्यासिंग रॉय नामक व्यक्ती बगिच्यात काम करीत असताना ंिभंत कोसळल्याने मृत्युमुखी पडली. मालदा जिल्ह्यात दोन शाळांच्या इमारती आणि एका बँकेचे छत कोसळले. सुजापूरच्या नईमौजा हायस्कूलचे छत कोसळल्याने १० विद्यार्थी जखमी झाले. तर बांगीटोलामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे छत कोसळून २५ लोक जखमी झाले.
बिहार : बिहारच्या विविध भागांत बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यांनी २५ लोक ठार तर १३३ जखमी झाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष सचिव अनिरुद्ध कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व चंपारण जिल्ह्यात सहा, सीतामढीमध्ये सहा, दरभंगात दोन तर सारण, सुपौल, अररिया, पश्चिम चंपारण आणि शिवहरमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती मृत्युमुखी पडली. याशिवाय पश्चिम चंपारण, शेखपुरा, किशनगंज, पूर्व चंपारण, शिवहर, नालंदा, दरभंगा आणि मुंगेरसह इतर जिल्ह्यांमध्ये भूकंपाने भिंती कोसळणे, दहशतीमुळे छतावरून उडी घेणे आणि जीव वाचवण्यासाठी पळण्याच्या धडपडीत ४८ लोक जखमी झाले. मुख्यमंत्री नितीशकुमार हे दिल्लीत असून, त्यांनी राज्याचे मुख्य सचिव अंजनीकुमार सिंग आणि पोलीस महासंचालक पी. के. ठाकूर यांना दूरध्वनी करून परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक निर्देश दिले.