टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग; उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:18 AM2022-08-07T07:18:05+5:302022-08-07T07:18:31+5:30
उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस
नवी दिल्ली : तरुणांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याचे प्रमाण काही वर्षांमध्ये खूप वाढले आहे. मात्र, टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीमुळे काही जणांचे आयुष्य उद्ध्वस्त हाेण्याची वेळ आली आहे. टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वारंवार वापर केल्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये काहीजणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
१४ जण अचानक आजारी पडले. त्यांना खूप ताप हाेता. टाईफाॅईड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ताप कमी हाेत नसल्यामुळे त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर लक्षात आले की, काेणीही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले नव्हते किंवा बाधिताचे रक्त देण्यात आले नव्हते. (वृत्तसंस्था)
ही काळजी घ्या...
पंडित दीनदयाल उपाध्याय रुग्णालयातील डाॅ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, एचआयव्हीग्रस्तांनी टॅटू काढले हाेते. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी नवीन सुई वापरण्यात येत असल्याची खात्री प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
पैसे वाचविण्यासाठी वापरली एकच सुई
सर्व रुग्णांनी अलीकडेच शरीरावर टॅटू काढला हाेता. धक्कादायक बाब म्हणजे टॅटू काढणाऱ्याने पैसे वाचविण्यासाठी एकाच सुईचा वापर केला हाेता. टॅटू काढण्यासाठी लागणारी सुई महाग असते. त्यामुळे अनेकजण एकाच सुईचा अनेकांवर वापर करतात. हा प्रकार अतिशय धाेकादायक आहे.