धक्कादायक! विजेच्या धक्क्याने १५ मृत्युमुखी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 05:57 AM2023-07-20T05:57:14+5:302023-07-20T05:58:20+5:30
मृतांचा पंचनामा सुरू असताना अपघात
डेहराडून (पीटीआय) : उत्तराखंडमधील चमोली शहरातील नमामि गंगे प्रकल्पाजवळील मलनि:सारण प्रकल्पात (एसटीपी प्लांट) बुधवारी विजेच्या धक्क्याने १५ जणांचा मृत्यू झाला. तेथील ट्रान्सफाॅर्मरमध्ये स्फोट झाल्यानंतर विजेचा धक्का बसून ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी म्हणाले की, मंगळवारी रात्री या प्रकल्पात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्याच मृताचा पंचनामा सुरू असताना तिथे पुन्हा विजेचा प्रवाह पसरला आणि १५ जणांचा मृत्यू झाला. जखमींना ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरने आणण्यात आले. (वृत्तसंस्था)
जयपूरमध्ये दोघांचा मृत्यू
जयपूर : राजस्थानमधील भिलवाडा शहरात विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. बाबूलाल मीना (४०) आणि नौशाद (३४) यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी बसस्थानक परिसरात असलेल्या एटीएमजवळ सापडले. दोघेही एका रस काढणाऱ्या यंत्राच्या संपर्कात आले, ज्यामध्ये वीज प्रवाह उतरला होता, असे मंडळ अधिकारी (सदर) योगेश शर्मा यांनी सांगितले.