अबब...मुलाच्या तोंडात आढळला तब्बल 526 दातांचा पुंजका; डॉक्टरांनाही बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:37 PM2019-08-01T13:37:06+5:302019-08-01T13:38:20+5:30
एखाद्याच्या तोंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दात असणे ही घटना अतिशय दुर्मिळ मानली जाते.
चेन्नई : एखाद्याच्या किडनीतून शेकडोंच्या संख्येने खडे, पोटातून सुया काढल्याच्या बातम्या नेहमी येतात. मात्र, एका 7 वर्षांच्या मुलाच्या तोंडामध्ये तब्बल 526 दात पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. चेन्नईच्या सविता डेंटल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली.
एखाद्याच्या तोंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दात असणे ही घटना अतिशय दुर्मिळ मानली जाते. या मुलाची हिरडी दुखत असल्याने त्याला या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्याच्या खालच्या जबड्याच्या उजव्या बाजुला खूप दुखत होते. हा मुलगा तीन वर्षांचा असताना पहिल्यांदा त्याचे तोंड दुखू लागले. पण त्याच्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण मुलगा त्यांना तोंड पाहूच देत नव्हता.
मात्र, पुढील दोन तीन वर्षांमध्ये हे दुखणे वाढूच लागले होते. यामुळे या मुलाच्या पालकांनी हॉस्पिटल गाठल्याचे प्राध्यापक पी सेंथीलनाथन यांनी सांगितले. या मुलाच्या एक्सरे आणि सीटी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे दात असल्याचे दिसून आले. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, जेव्हा ऑपरेशन सुरु झाले तेव्हा दातांची संख्या काही संपत नव्हती. यामुळे धक्का बसला. या पुंजक्यातील शेवटचा दात काढला तेव्हा हे दात पाहून आश्चर्य वाटले. या दातांची संख्या 526 वर जाऊन पोहोचली होती. यामध्ये छोटे, मध्यम आणि मोठ्या आकाराचे दात होते, असे सेंथीलनाथन यांनी सांगितले.
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना 5 तास लागले. जवळपास मिनिटाला दोन अशा प्रमाणावर दात काढण्यात आले. हा प्रकार डॉक्टरांसाठीही नवाच होता. शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलाला तब्येत स्थिर व्हायला तीन दिवस लागले.
डॉक्टरांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणावर दातांचा पुंजका असणे हे जगातील पहिलेच प्रकरण आहे.