धक्कादायक! Redmi नंतर आता 'या' कंपनीचा फोन फुटला, 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:40 PM2022-09-13T14:40:50+5:302022-09-13T14:41:01+5:30
मोबाईल फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, आता ताज्या घटनेत एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.
बरेली: मोबाईल फोन चार्जिंग करताना फोनवर बोलू नका, फोन प्रमाणापेक्षा जास्त चार्ज करु नका, असे अनेकदा आवाहन केले जाते. पण, अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोबाईल स्फोटच्या घटना घडतात. यात अनेकदा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली आहे. पण, या घटनेत अवघ्या 8 महिन्यांच्या चिमुकलीला आपलाजीव गमवावा लागला आहे. ही घटना मोबाईल चार्जिंग दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे.
अतिचार्जिंगमुळे मोबाईल गरम झाला
मिळालेल्या माहितीनुसार, सोलर पॅनलद्वारे मोबाईल चार्ज केला जात होता. यादरम्यान फोनची बॅटरी अति चार्ज होऊन गरम झाली आणि फोनचा स्फोट झाला. फोनचा स्फोट झाला तेव्हा शेजारी बसलेली 8 महिन्यांची मुलगी गंभीररित्या भाजली गेली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले, पण डॉक्टर त्या चिमुकलीचा जीव वाचवू शकले नाही.
लावा कंपनीचा होता मोबाईल
मोबाईल स्फोटाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा चार्जिंगदरम्यान स्फोट झाल्याच्या बातम्या घडल्या आहेत. अलीकडेच एका YouTuber ने आरोप केला होता की, Redmi 6A च्या स्फोटामुळे त्याच्या मावशीचा मृत्यू झाला. याबाबत त्यांने कंपनीकडून उत्तर मागितले आहे. दरम्यान, बरेलीमध्ये घडलेली घटना लावा कंपनीच्या फोनची आहे. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. तसेच, पीडित कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे कंपनीने सांगितले आहे.
मोबाईल का ब्लास्ट होतात?
स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन (Lithium Ion) बॅटरी वापरली जाते. स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची बॅटरी. काहीवेळा एक्स्टर्नल फोर्समुळे बॅटरीचा स्फोट होतो, तर काहीवेळा सदोष युनिटमुळेही होतो. याशिवाय चार्जिंग दरम्यान काही चुकांमुळे बॅटरीचा स्फोटही होऊ शकतो. स्मार्टफोनचा स्फोट झाल्यावर कंपन्या सामान्यतः ग्राहकांना दोष देतात. कारण ग्राहकाने मूळ चार्जर वापरला नाही, असे त्यांचे म्हणणे असते.