धक्कादायक! बाळाला घेऊन जाणारी अॅम्ब्युलन्स जेवणासाठी धाब्यावर थांबली, चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 08:21 AM2020-08-12T08:21:52+5:302020-08-12T08:26:34+5:30
डायरिया झाल्याने रविवारी बारीपदाच्या पीआरएम मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 1 वर्षाच्या बाळाला प्रकृती बिघडल्याने कटक येथील शिशू भवनमध्ये नेण्यात येत होते.
भुवनेश्वर - ओडिशातील आदिवासी बहुल भागात एक बेजबाबदार आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील मयूरभंज जिल्ह्यात गंभीर आजारी असलेल्या रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाटेतच गाडी थांबवली. विशेष म्हणजे मुलगा आजारी असतानाही ते गाडी थांबवून जेवण करत बसले. त्यामुळे, रुग्णावाहिका रुग्णालयात उशिरा पोहोचल्याने बाळावर उपचार होण्यास विलंब झाला, त्यात चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेत, तेथील तंत्रज्ञाला नोकरीवरुन कमी केलंय.
डायरिया झाल्याने रविवारी बारीपदाच्या पीआरएम मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 1 वर्षाच्या बाळाला प्रकृती बिघडल्याने कटक येथील शिशू भवनमध्ये नेण्यात येत होते. याप्रकरणी माहिती देताना मुलाच्या आईने रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच बाळाचा जीव गेल्याचे सांगितले. मुलाची आई गीता बेहरा यांनी सांगितले की, 108 नंबरवर कॉल करुन बोलाविण्यात आलेली रुग्णवाहिका मुलाला घेऊन रुग्णालयातून निघाली. त्यावेळी, आम्हीही बारीपदा येथून कटककडे निघालो होतो. मात्र, रुग्णवाहिकेचा चालक, फार्मासिस्ट आणि अटेंडेंटने रस्त्यातच रुग्णावाहिका थांबवून जेवण करण्याचा निर्णय घेतला.
बारीपदाजवळ 6 किमी अंतरावरील एका धाब्यावर या सर्वांनी गाडी थांबवून जेवण केलं. या धाब्यावर जवळपास दीड तास यांनी जेवणासाठी घालवला आहे. त्यामुळे, ठराविक वेळेत रुग्णालयात न पोहोचल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप बेहरा यांनी केला आहे. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच मुलाला जीव गमावावा लागला आहे. विशेष म्हणजे मुलाची प्रकृती ढासळल्यानंतरही फार्मासिस्टने त्याला सलाईनही दिले नाही. दरम्यान, याप्रकरणी मुलाची आई गीता बेहरा यांनी रुग्णावाहिका कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.