धक्कादायक! माजी जवानाला बांगलादेशातील घुसखोर ठरवून आसाम पोलिसांनी पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 03:25 PM2017-10-01T15:25:15+5:302017-10-01T15:30:23+5:30
आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे.
गुवाहाटी - आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे. मोहम्मद अजमल हक हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. मात्र आज त्यांना भारताचे नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागतो आहे.
आसाम पोलिसांनी हक यांना बांगलादेशी घुसखोर ठरवत नोटीस बजावून भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं आहे. अनेक वर्षं लष्करात ज्युनिअर ऑफिसर म्हणून काम करून ते निवृत्त झाले. मोहम्मद अजमल हक हे गुवाहाटीला वास्तव्याला आहेत. परंतु गेल्या महिन्यात पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीमुळे ते हैराण झाले. पोलिसांनी त्या नोटिशीत त्यांनी भारताचं नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं होतं. तुम्ही बांगलादेशी घुसखोर नाही, तर भारतीयच आहात, हे सिद्ध करा, असं हक यांना नोटिशीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.
आसाममध्ये बाहेरून म्हणजे खास करून बांगलादेशातून आलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी 100 फॉरनर्स ट्रीब्यूनल्सची स्थापना केली आहे. हक यांना मिळालेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, तुमच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी केस दाखल केली आहे. तुम्ही 25 मार्च 1971नंतर भारतात कोणत्याही कारणाशिवाय घुसखोरी केली आहे. 25 मार्च 1971 रोजीच पाकिस्तानच्या सेनेनं पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशातील लोकांविरोधात ऑपरेशन सर्चलाइट सुरू केलं होतं. हक यांना बजावलेल्या नोटिशीत 11 सप्टेंबरला न्यायालयासमोर येऊन स्वतःची नागरिकता सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे. परंतु हक यांना ही नोटीसच 11 सप्टेंबरनंतर मिळाली आहे. कारण ही नोटीस त्यांचं गाव कालाहीकशला पाठवण्यात आली होती. कालाहीकश हे गुवाहाटीहून 70 किलोमीटर दूर आहे. आता 13 ऑक्टोबरला हक न्यायाधिकरणासमोर उपस्थित राहणार आहेत. हक हे 1986मध्ये टेक्निशियन म्हणून भारतीय लष्करात भरती झाले होते. विशेष म्हणजे 2012 रोजी हक यांची पत्नी मुमताज बेगम यांना नोटीस पाठवून नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं.