धक्कादायक, मृतदेहांची झाली अदलाबदल; अनोळखी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 16:14 IST2020-05-12T15:41:18+5:302020-05-12T16:14:42+5:30
मृतदेह बदलण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिका-यांवर गंभीर आरोप होत आहेत. चेहरा न दाखवता मृतदेह कुटुंबाकडे सोपवला, असा आरोप केला जात आहे.

धक्कादायक, मृतदेहांची झाली अदलाबदल; अनोळखी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा आरोग्य विभाग आणि शवविच्छेदनगृहातील कामगारांच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी चूक झाली. विशेष म्हणजे आग्रा कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनले आहे. आग्रा हे उत्तर प्रदेशामधील सर्वाधिक बाधित शहरांपैकी एक आहे. आग्रामध्ये राहणारे शोएबच्या वडिलांचा 10 मे रोजी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी शोएबला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोपवण्यात आला. तर शोएबच्या वडिलांचा मृतदेह हा मनोज नावाच्या व्यक्तीला सोपवण्यात आला. परिणामी, शोएबच्या वडिलांच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या कुटुंबाने हिंदू प्रथेनुसार मृतदेहाचे अंतिम संस्कारही केले. मात्र नंतर एसएन मेडिकल कॉलेजने मृतदेहाची अदलाबदल केल्याचे उघडकीस आले.
मृतदेह बदलण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिका-यांवर गंभीर आरोप होत आहेत. चेहरा न दाखवता मृतदेह कुटुंबाकडे सोपवला, असा आरोप केला जात आहे. अशा परिस्थितीत शोएबच्या वडिलांचा मृतदेह दुसर्या कुटुंबात पोहोचला आणि अंत्यसंस्कारही केले गेले. त्याचदरम्यान खवसपुरामधील शहागंज कुटुंब देखील मृतदेह घेण्यासाठी शवविच्छेदनगृहात पोहोचले होते, या कुटुंबाला अद्याप वडिलांचा मृतदेह सापडलेला नाही.
कोरोनाच्या कहरात शोएबच्या आईचेही पाच दिवसांपूर्वी निधन झाले होते. आता कुटुंबात फक्त शोएब आणि त्याचा धाकटा भाऊ आहे. आग्रा शहराला कोरोना विषाणूचा जास्त परिणाम झाला आहे. आग्राचे महापौर नवीन जैन यांनीही या शहराला 'देशाचे वुहान' असे म्हटले आहे. आग्रामध्ये कोरोना विषाणूची 44 हॉटस्पॉट्स आहेत, त्यापैकी 3 ग्रामीण भागात आढळून आली आहेत. आग्रा येथे एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक पत्रकारांवर उपचार सुरू आहेत.