धक्कादायक! २४ गुन्हे दाखल झाल्याचे सांगत संपूर्ण कुटुंबाला केलं डिजिटल अरेस्ट, उकळले १ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:02 IST2025-02-11T11:01:52+5:302025-02-11T11:02:22+5:30
Digital arrest : काही सायबर गुन्हेगारांनी एका कुटुंबाला तब्बल पाच दिवस डिजिटल अरेस्ट करून ठेवल्याचं उघड झालं आहे. तसेच या कुटुंबाकडून तब्बल १ कोटी रुपये उकण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

धक्कादायक! २४ गुन्हे दाखल झाल्याचे सांगत संपूर्ण कुटुंबाला केलं डिजिटल अरेस्ट, उकळले १ कोटी
सायबर गुन्हेगारांकडून डिजिटल अरेस्ट करून लुबाडणूक होण्याचे प्रकार वाढले असतानाच उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही सायबर गुन्हेगारांनी एका कुटुंबाला तब्बल पाच दिवस डिजिटल अरेस्ट करून ठेवल्याचं उघड झालं आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, काही अज्ञात लोकांनी एका कुटुंबाला पाच दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून १ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम उकळली. या कुटुंबाला फोन केल्यावर आरोपींनी आपण सरकारी अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर ते या कुटुंबाला आपल्या जाळ्यात अडकवत गेले.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, चंद्रभान पालिवाल नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीत केलेल्या उल्लेखानुसार त्यांना १ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी संपर्क साधण्यास सांगितले. तसेच त्यांची सिमकार्ड ब्लॉक करण्याची धमकी दिली.
पोलीस उपायुक्त (सायबर क्राईम) यांनी सांगितले की, तक्रारकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचं प्रकरण मुंबईच्या सायबर क्राईम ब्रँचकडे असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर १० मिनिटांनी आयपीएस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना मुंबईतील एका पोलीस स्टेशनमधून व्हिडीओ कॉल केला.
पीडित पालिवाल यांनी पुढे सांगितले की, या बनावट पोलीस अधिकाऱ्याने आमच्यावर पैसे हडप केल्याचा आरोप केला. तसेच आमच्याविरोधात विविध ठिकाणी २४ गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. तसेच सीबीआय मनी लाँड्रिंगच्या प्रकरणातही चौकशी करत असल्याचे या तथाकथित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हा व्हिडीओ कॉल आल्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबालाही डिजिटल अरेस्ट करण्यात आले, अशी माहितीही पालिवाल यांनी दिली.
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित पालिवाल यांना पैसे न दिल्यास लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती आरोपींनी दिली. त्यामुळे पालिवाल यांनी घाबरून पाच दिवसांच्या आत आरोपींना तब्बल १ कोटी १० लाख रुपये दिले. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.