धक्कादायक! दुस-या जातीत लग्न केल्यामुळे 'तिचा' मृतदेह न्यावा लागला सायकलवरून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 04:35 PM2018-08-02T16:35:35+5:302018-08-02T16:35:44+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये एका व्यक्तीवर अॅब्युलन्ससाठी पैसे नसल्यानं पत्नीचा मृतदेह खांद्यावरून स्मशानापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली होती.
भुवनेश्वर- गेल्या काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये एका व्यक्तीवर अॅब्युलन्ससाठी पैसे नसल्यानं पत्नीचा मृतदेह खांद्यावरून स्मशानापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली होती. हा प्रकार ताजा असतानाच अजून एक अशाच प्रकारची घटना बौद्ध जिल्ह्यात घडली आहे. जेव्हा पत्नीच्या बहिणीचा मृत्यू झाला, त्यावेळी तिच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाहीत.
त्यामुळे नाइलाजास्तव या व्यक्तीला पत्नीच्या बहिणीचा मृतदेह सायकलवरून बांधून स्मशानापर्यंत घेऊन जावा लागला आहे. मृत महिलेच्या बहिणीच्या पतीनं दुस-या जातीतल्या मुलीशी लग्न केल्यामुळे समाजानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. ओडिशातल्या कृष्णापल्ली गावात राहणा-या चतुर्भुज बांक यांनी पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती न झाल्यानं जातीबाहेरच्या मुलीबरोबर दुसरं लग्न केलं. त्यानंतर गावानं त्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला होता.
चतुर्भुजच्या पत्नीच्या बहिणीला गेल्या काही दिवसांपूर्वी डायरिया या रोगानं पछाडलं होतं. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. परंतु तिच्या मृतदेहाला गाववाल्यांनी खांदा दिला नाही. त्यामुळे त्याला पत्नीच्या बहिणीचा मृतदेह सायकलवरून स्मशानापर्यंत घेऊन जावा लागला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.