धक्कादायक! लॉग ऑपरेटरच्या चुकीमुळे नवी दिल्लीला जाणारी ट्रेन पोहोचली जुन्या दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:38 PM2018-03-27T21:38:39+5:302018-03-27T21:38:39+5:30
राजधानीत एका लॉग ऑपरेटरच्या चुकीचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. या लॉग ऑपरेटरनं नवी दिल्लीची ट्रेन जुन्या दिल्लीत, तर जुन्या दिल्लीची ट्रेन नव्या दिल्लीत पाठवण्याची घोडचूक केली आहे.
नवी दिल्ली- राजधानीत एका लॉग ऑपरेटरच्या चुकीचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. या लॉग ऑपरेटरनं नवी दिल्लीची ट्रेन जुन्या दिल्लीत, तर जुन्या दिल्लीची ट्रेन नव्या दिल्लीत पाठवण्याची घोडचूक केली आहे. त्या लॉग ऑपरेटरच्या चुकीमुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणा-या जवळपास 100हून अधिक प्रवाशांना मनस्ताप झाला आहे. रेल्वे प्रशासनानंही याची दखल घेत दोषी अधिका-याला तात्काळ निलंबित केलं आहे.
मंगळवारी सकाळी 7.38च्या सुमारास या दोन्ही ट्रेन सदर बाजार स्टेशनवर आल्या होत्या. दोन्ही ट्रेन एकाच वेळी स्टेशनवर आल्यानं लॉग ऑपरेटर काहीसा गोंधळात पडला. आणि त्यानं पानिपत-नवी दिल्ली (64464) ट्रेनला जुन्या दिल्लीकडे मार्गस्थ करण्याचा सिग्नल दिला. तर सोनेपत-जुनी दिल्ली (64004) ट्रेनला नव्या दिल्लीच्या दिशेनं पाठवलं. त्याच्या या चुकीमुळे ऐन कार्यालयीन वेळेत कामावर जाणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
उत्तर रेल्वेचे प्रवक्ते नितीन चौधरी म्हणाले, जेव्हा आम्हाला चूक लक्षात आली, त्यावेळी तात्काळ पुन्हा आम्ही दोन्ही ट्रेनचा मार्ग बदलला. असा प्रकार फारच दुर्मीळपणे घडला आहे. लोकल ट्रेनच्या बाबतीत असे प्रकार घडत नाहीत. रेल्वे अधिकारी आणि ऑपरेटर्सना गाडी नंबर चांगल्या प्रकारे माहीत असतात. तसेच त्या ट्रेनचं नाव आणि मार्गाबाबतही त्यांना कल्पना असते. मागच्या वर्षीही मोरादाबादहून चुकीनं टुंडाला ट्रेन गेली होती.