धक्कादायक ! करवा चौथचा उपवास न ठेवल्याने पत्नीला चाकूने भोसकले, नंतर इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:32 AM2017-10-09T11:32:48+5:302017-10-09T11:34:18+5:30
करवा चौथचा उपवास ठेवला नाही या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. पत्नीला चाकून भोसकल्यानंतर पतीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
नवी दिल्ली - करवा चौथचा उपवास ठेवला नाही या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. पत्नीला चाकूने भोसकल्यानंतर पतीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. दिल्लीमधील रोहिनी परिसरात रविवारी ही घटना घडली. पत्नीने करवा चौथचा उपवास ठेवला नाही यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. याच संतापात पतीने पत्नीवर चाकूने वार केले आणि त्यानंतर स्वत: इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगीही तिथेच उपस्थित होती.
पीडित पत्नीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. दरम्यान पती जसविंदर सिंग याचा रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. दांपत्याचा घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर त्यांनी वेगळं राहण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसविंदर सिंग गेल्या एक महिन्यापासून आपली पत्नी आणि मुलीपासून विभक्त झाला होता. आपल्या मुलीला भेटण्यासाठी तो घरी गेला होता. न्यायालयाने त्याला विकेण्डला मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली होती. जसविंदर सिंग घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीचे दोन भाऊ घरात उपस्थित होते. आपल्याला काहीचरी महत्वाचं बोलायचं आहे असं सांगत त्याने पत्नीला गच्चीवर नेले. यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगीही मागोमाग गच्चीत गेली. दोघांमध्ये बोलणं चालू असताना भांडणाला सुरुवात झाली. याचवेळी जसविंदर सिंगने चाकूने पत्नीवर वार केले. जखमी अवस्थेत पत्नीने खाली धाव घेतली.
आरडाओरड ऐकल्यानंतर शेजा-यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्याचदरम्यान जसविंदर सिंगने चौथ्या माळ्यावरुन उडी मारली. खाली पडल्यानंतर जसविंदर सिंग डोक्यावर आदळला. पतीने गच्चीतून उडी मारल्याचं पाहताच पत्नीने खाली धाव घेतली तेव्हा जसविंदर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ते दृश्य पाहून पत्नी जाग्यावरच बेशुद्ध पडली.
शेजा-याने रात्री 12.30 वाजता पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. जसविंदर सिंगने उडी मारल्यानंतर आधी तो एका गाडीवर पडला, त्यानंतर खाली जमिनीवर आपटला. के एन काटजू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जसविंदर सिंग एका खासगी कंपनीत खरेदी-विक्री एजंट म्हणून काम करत होता. गेल्या एक महिन्यापासून आपल्या आई-वडिलांसोबत तो राहत होता. त्याला आपल्या मुलीची खूप आठवण यायची असं त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.