Video : धक्कादायक...निवडणूक कर्मचारीच सांगत होता 'सायकलचे' बटण दाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:16 AM2019-04-23T11:16:14+5:302019-04-23T11:20:34+5:30
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये असा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावरील एक कर्मचारीच मतदारांना सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत असल्याचे समोर आले आहे.
मुरादाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेवेळी निवडणूक आयोगाकडून सरकारी कर्मचारी नेमले जातात. मात्र, या निवडणूक कर्मचाऱ्यांकडूनच मतदारांना कोणाला मतदाने करावे हे सांगितले जात असेल तर? उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये असा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावरील एक कर्मचारीच मतदारांना सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत असल्याचे समोर आले आहे.
देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. यावेळी मुरादाबादमधील बूथ क्रमांक 231 मध्ये तैनात असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याने मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या सायकलसमोरील बटण दाबण्याच्या सूचना केल्या. यावेळी हा प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिस, निवडणूक अधिकाऱ्यांसमक्ष चोप दिला.
या कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये निवडणूक आयोगाचे ओळखपत्र होते. हा कर्मचारी रांगेत उभे असलेल्या मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान करण्यास सांगत होता. पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले तरीही त्याला मारहाण होत होती.