धक्कादायक ! गुरमीत राम रहीमनं स्वतःच्या सेवेसाठी लावली होती तब्बल 250 साध्वींची ड्युटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 12:59 PM2017-08-28T12:59:01+5:302017-08-28T13:03:14+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यानं महिला अनुयायांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी न्यायालयानं त्याला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी गुरमीत राम रहीमची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
पंचकुला, दि. 28 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यानं महिला अनुयायांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी न्यायालयानं त्याला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी गुरमीत राम रहीमची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुरमीत राम रहीमनं खासकरुन आपल्या सेवेसाठी साध्वींची ड्युटी लावली होती, अशी माहिती समोर आली आहे. गुरमीत राम रहीमनं स्वतःच्या सेवेसाठी जवळपास 200 ते 250 साध्वी तैनात केल्या होत्या, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष प्रशिक्षण देण्यात येणा-या या साध्वींना कोणत्याही पुरुषासोबत संवाद साधण्याची सक्त मनाई करण्यात आली होती. या साध्वी ज्या ठिकाणी वास्तव्यास होत्या तिथून 8 ते 10 फूट अंतरावरही पुरुषांना पाऊल ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एका साध्वीनं पाठवलेल्या पत्राच्या आधारे राम रहीमच्या सेवेत हजर असणा-या या साध्वींवर कित्येक प्रकारे अत्याचार होत असल्याची धक्कादायक व गंभीर बाब उजेडात आली होती. गुरमीत राम रहीम हा सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या साध्वींचं लैंगिक शोषण करत होता, असा आरोप आहे. पत्रात असेही नमूद करण्यात आले होते की, राम रहीमच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या या साध्वींचं वय 35 ते 40 दरम्यान होते. या साध्वींचं आयुष्य खूपच वाईट असते.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते डेरा मुख्यालयात दाखल होते तेव्हाच सत्य परिस्थिती समोर येईल व समजू शकेल की नेमक्या कोणत्या प्रकारे या साध्वींवर अत्याचार केले जातात. शिवाय, गुरमीत राम रहीमची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता डेरामधील आणखी काही पीडित साध्वींची प्रकरणं समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण
2002 पासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम
एप्रिल 2002 : सिरसातील डेरा सच्चा सौदा येथे महिला अनुयायांचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार करणारे निनावी पत्र पंजाब व हरियाणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिण्यात आले होते.
मे 2002 : हायकोर्टानं सिरसा जिल्हा आणि सत्र न्यायालयाला डेरा सच्चा सौदाविरोधात पत्राद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले.
सप्टेंबर 2002 : महिला अनुयायांचं लैंगिक शोषण होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर हायकोर्टानं पुढील चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.
डिसेंबर 2002 : सीबीआयनं डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमविरोधात बलात्कार व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
जुलै 2017 : सीबीआयनं अंबाला कोर्टात गुरमीत राम रहीमविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात 1999 ते 2001 यादरम्यान दोन साध्वींचे (महिला अनुयायी) लैंगिक शोषण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
सप्टेंबर 2008 : सीबीआयच्या विशेष न्यायालयानं गुरमीत राम रहीमविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
2009 ते 2010 दरम्यान तक्रारकर्त्यांनी कोर्टासमोर आपला जबाब नोंदवला
एप्रिल 2011 : गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण अंबाला कोर्टातून पंचकुला सीबीआय कोर्टाकडे वर्ग करण्यात आला.
जुलै 2017 : विशेष सीबीआय न्यायालयाकडून नियमित सुनावणीचे आदेश
ऑगस्ट 17, 2017 : फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी शिक्षा सुनावण्यासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित केली.
ऑगस्ट 25, 2017 : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले.
गुरमीत राम रहीमला पळवण्याचा होता कट
दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सात जणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत.
समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले-
पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या.