धक्कादायक! हायव्होल्टेज तार अंगावर पडली; तरुणासह दोन चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 21:07 IST2024-12-29T21:06:35+5:302024-12-29T21:07:36+5:30
बाप-लेकीसह 9 वर्षीय भाचीचा जागीच मृत्यू

धक्कादायक! हायव्होल्टेज तार अंगावर पडली; तरुणासह दोन चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू
UP Accident : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रविवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. येथील सोनबरसा बाजारात हायव्होल्टेज तार धावत्या दुचाकीवर पडली, ज्यामुळे दुचाकीवरील तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे.
दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 24 वर्षीय तरुणासह नऊ आणि दोन वर्षीय मुलींचा मृत्यू झाला आहे. एम्स पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लोकांना समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या.
तारेमध्ये 11 हजार व्होल्ट करंट
या घटनेत शिवराज निषाद(24), त्याची दोन वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांची भाची, यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांवर तब्बल 11000 व्होल्टची लाईन पडल्याने, तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मदत पोहोचेपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागरिकांनी विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत घटनास्थळी चांगलाच गोंधळ घातला.