धक्कादायक! करौली हिंसाचारानंतर हिंदूंचं पलायन; घरे आणि दुकानांबाहेर लागले 'मालमत्ता विक्री'चे बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:58 PM2022-04-13T12:58:53+5:302022-04-13T13:04:00+5:30
राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सर अथवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे.
जयपूर - रामनवमी आणि नवसंवत्सराच्या दिवशी (2 एप्रिल) देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगड आदी राज्यांमध्ये सांप्रदायिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांमध्ये अनेक जण जखमीही झाले. यानंतर, आता या राज्यांत पोलिसांकडून कारवाईही सुरू आहे. अनेकांना अटकही करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील हिंसाचारात सहभागी आरोपींच्या घरांवर आणि दुकानांवर तर बुलडोझर चालवण्यात आले. मात्र, यातच राजस्थानातील करौलीतील हिंसाचारानंतर, हिंदूंच्या पलायनाचे वृत्त आहे.
राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सराच्या दिवशी (भारतीय नव वर्ष) हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे. जागरण डॉट कॉमने दिलेल्या एका वृत्तानुसार, येथील मुस्लीम बहूल भागांतून हिंदू आपली घरे आणि दुकाने विकून दुसरीकडे पलायन करत आहेत. दोन घरे आणि काही दुकानांवर तर एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी कब्जा केला आहे. तर, अनेक ठिकाणी हिंदूंनी घराबाहेर आणि दुकानांबाहेर ‘मालमत्ता विक्रीचे’ बोर्ड लवले आहेत.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, गेल्या आठवडाभरात येथील लोक आपली घरे आणि दुकाने सोडून एकतर करौलीमध्येच दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले आहेत अथवा घरा-दारांना कुलूप लावून दुसरीकडे निघून गेली आहेत. या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. पलायन करणाऱ्या लोकांत, जाटव, खटीक, धोबी आणि कुमावत समाजातील लोकांचा समावेश आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि प्रदेश भाजपाध्यक्ष सतीश पुनिया बुधवारी करौलीला भेट देणार आहेत.
मंत्री म्हणाले, पलायन झालेच नाही -
यासंदर्भात बोलताना राज्य सरकारमधील पंचायत राज मंत्री रमेश मीणा म्हणाले, कसल्याही प्रकारचे स्थलांतर झालेले नाही. यासंदर्भात अफवा पसरवली जात आहे. हिंदूंनी स्थलांतर केलेले नाही. मात्र, भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीणा यांनी आतापर्यंत स्थलांतरित झालेल्या 195 जणांची यादी प्रशासनाकडे सोपवली आहे.