धक्कादायक! नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? पीएमओकडे आकडेवारीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:18 AM2019-02-14T10:18:59+5:302019-02-14T10:20:38+5:30
नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत पीएमओकडे माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे.
नवी दिल्ली - काळापैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सर्वसामान्यांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले होते. जुन्या नोटा जमा करून रोख रक्कम मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले होते. त्यादरम्यान, काही जणांचा रांगेत मृत्यू झाल्याचेही समोर आले होते. मात्र नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत पीएमओकडे माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नोटाबंदीच्या काळात देशात किती मृत्यू झाले, याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आली होती. त्याला उत्तर देताना नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याची माहिती पीएमओकडे नाही, असे पीएमओच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सूचना आयुक्तांसमोर सांगितले. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर काही व्यक्तींचा रांगेमध्ये तर काही जणांचा कामावर असताना मृत्यू झाल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या.
नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत माहिती घेण्यासाठी नीरज शर्मा यांनी पीएमओ कडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. तसेच त्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती मागवली होती. मात्र पीएमओकडून निर्धारित 30 दिवसांमध्ये माहिती न मिळाल्याने त्यांनी केंद्रीय माहिती आयुक्तांकडे धाव घेत पीएमओमधील माहिती अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.
अखेरीस केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणी वेळी पीएमओमधील माहिती अधिकाऱ्यांनी माफी मागितली. तसेच शर्मा यांनी जी माहिती मागवली आहे ती माहितीचा अधिकार कायद्यातील कमल 2 (एफ) अंतर्गत माहितीच्या कक्षेत येत नाही, असे सांगितले.
दरम्यान, तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना 18 डिसेंबर 2018 रोजी मिळालेल्या माहितीप्रमाणे नोटाबंदी दरम्यान स्टेट बँकेच्या तीन अधिकाऱ्यांचा एका ग्राहकाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते.