धक्कादायक! पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला लागली गळती, मुख्य पुजाऱ्यांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 05:57 PM2024-06-24T17:57:48+5:302024-06-24T17:58:37+5:30
Ram Mandir Ayodhya: कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येमधील राम जन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. अयोध्येतील भव्य राम मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज अयोध्येत येत असतात. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.
रामललांचे प्रमुख पुजारी आचार्च सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाच्या छतामधून काही दिवसांपूर्वी पाण्याची गळती होत होती. त्यानंतर दुरुस्तीचं काम करून ही गळती बंद करण्यात आली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसामध्ये मंदिरात पुजाऱ्यांचं बसण्याचं ठिकाण आणि व्हीआयपी दर्शनासाठी जिथे लोक येतात, त्याठिकाणी पावसाचं पाणी गळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला.
रामललांचे मुख्य पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडण्यात आलं होतं. मात्र मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात रामललांच्या मंदिरातील छताला गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती धक्कादायक आहे. राम मंदिराच्या बांधकामामध्ये काही हलगर्जी झाल्याचं दिसत आहे. रात्री पाऊस पडला. तसेच सकाळी पुजारी जेव्हा पूजेसाठी मंदिरात गेले, तेव्हा तिथे पाणी भरलेलेल दिसून आले. खूप प्रयत्न करून हे पाणी मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहितीही त्यांनी दिली.