शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 04:13 PM2021-05-25T16:13:05+5:302021-05-25T16:13:20+5:30
उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत.
प्रयागराज - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. उपचार मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल सुरूच आहेत. कोरोनामुळे मृत पावल्यानंतरही हालअपेष्टा काही संपताना दिसत नाही. उत्तर प्रदेशात मृतदेहांची विटंबना झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. गेल्या दीड महिन्यांत नदीच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले गेले आहेत. अजूनही दररोज नदी किनारी असलेल्या वाळूत मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह पुरले गेल्यानंतर त्याच्या चारही बाजूंनी बांबू उभारण्यात येत आहेत. मृतदेह पुरण्यात आल्याचं इतरांना समजावं यासाठी त्याच्या बाजूला बांबू लावण्यात आले आहेत. आता, याच मृतदेहांच्या अंगावरील वस्त्रही काढून नेण्यात येत असल्याचा व्हिडिओ प्रियंका गांधी यांनी ट्विट केला आहे.
जीते जी ढंग से इलाज नहीं मिला। कितनों को सम्मान से अंतिम संस्कार नहीं मिला। सरकारी आंकड़ों में जगह नहीं मिली। अब कब्रों से रामनामी भी छीनी जा रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
छवि चमकाने की चिंता में दुबली होती सरकार पाप करने पर उतारू है। ये कौन सा सफाई अभियान है?
ये अनादर है-मृतक का, धर्म का, मानवता का pic.twitter.com/PHC1fyMKCL
जिवंत असताना नीटनेटका उपचार मिळत नाही, सन्मानाने अंत्यंसस्कार होत नाही. सरकारी आकड्यांमध्येही जागा मिळेना. आत स्मशानातून रामनामीही काढून घेण्यात येत आहे, असे म्हणत प्रियंका गांधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अग्नीदेण्याऐवजी पुरले मृतदेह
हिंदू धर्मात मृतदेहांना अग्नी दिला जातो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील मृतांचा आकडा झपाट्यानं वाढला आहे. त्यामुळे काही भागांत अंत्यविधीसाठी लाकडंदेखील मिळत नाहीत. प्रयागरासोबतच प्रतापगड, सुलतानपूर आणि फैजाबादमध्ये मृतांचा आकडा वाढला आहे. या ठिकाणी दिवसाला ५० ते ६० जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. एप्रिल महिन्यात श्रृंगवेरपुर घाटात दररोज शेकडो जणांवर अंत्यसंस्कार केले जात होते. लाकडांची टंचाई जाणवू लागल्यानं कंत्राटदारांनी लोकांकडून जास्त पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांनी मृतदेहांना अग्नी देण्याऐवजी ते पुरण्यास सुरुवात केली.