धक्कादायक : गृहमंत्रालयात ज्युनियर कर्मचारी पाहायचे पॉर्न व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:13 AM2018-04-12T10:13:57+5:302018-04-12T10:14:38+5:30
गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे.
मुंबई - गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही ज्युनियर कर्मचारी ऑफीसमध्येच पॉर्न फिल्म पाहायचे, तसेच असे व्हिडिओ डाऊनलोड करायचे, त्यामुळे कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये समस्या उद्भवत असे, असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमसचिव जी. के. पिल्ले यांनी केला आहे.
डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे (डीएससीआय) अध्यक्ष असलेले पिल्ले म्हणाले, "आठ नऊ वर्षांपूर्वी जेव्हा मी केंद्रीय गृहसचिव म्हणून कार्यरत होतो. तेव्हा दर दोन महिन्यांनी संपूर्ण संगणक प्रणालीमध्ये बिघाड झालेला आमच्या निदर्शनास येत असे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी संध्याकाळी उशिरापर्यंत बैठकांमध्ये गुंतलेले असायचे, त्यामुळे ज्युनियर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावे लागत असे. या वेळेत हे कर्मचारी इंटरनेटवर जाऊन अश्लील वेबसाइट्सना भेट देत असत. तिथून ते विविध व्हिडिओ डाऊनलोड करत असत. या व्हिडिओंसोबत मालवेअरही डाऊनलोड होत असत."
गृहमंत्रालयाने केलेल्या सखोल चौकशीमधून कर्मचाऱ्यांकडून होत असलेले हे गैरप्रकार उघड झाले होते. गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पिल्ले यांनी हा गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली आहे. मात्र गृहमंत्रालयाच्या वेबसाइट हॅक झाल्या नसून हार्डवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्रालयाकडून देण्यात आले होते.