धक्कादायक! काश्मीरमध्ये पोलिसवालेच दहशतवाद्यांना पुरवत होते शस्त्रास्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:00 PM2017-10-11T14:00:04+5:302017-10-11T14:00:42+5:30
जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील काही पोलीसच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संरक्षण दलांमध्ये खळबळ उडाली आहे.
श्रीनगर - ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडून भारतीय लष्कराने काश्मीरमधील फुटिरतावादी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र याचदरम्यान जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील काही पोलीसच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संरक्षण दलांमध्ये खळबळ उडाली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांना हत्यारे आणि शस्रास्त्रे पुरवत असलेल्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. तसेच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या रॅकेटमध्ये पोलीसदलाचे दोन कॉन्स्टेबल असल्याचेही उघड झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियाँन जिल्ह्यात 9 ऑक्टोबरला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि एके-47 जप्त केले होते. या कारवाईकडे लष्करासाठी मोठे यश म्हणून पाहिले जात होते. दरम्यान, यानंतरच या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.
J&K: On 9 Oct J&K Police busted a module of ammunition supply to Hizbul Mujahideen & recovered live rounds of AK-47.
— ANI (@ANI) October 11, 2017
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले पण आपले दोन जवानही शहीद झाले. चकमक संपलेली नसून, ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही काही दहशतवादी इथे लपले असण्याची शक्यता आहे. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे असल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा सोमवारी भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असे म्हटले होते. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.