धक्कादायक: जिवंत शेतकरी कागदोपत्री मृत, बँकेतून ऊसाचे बिल मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 10:09 AM2022-09-11T10:09:06+5:302022-09-11T10:29:36+5:30
एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो.
शहाजहाँपूर - सरकार दरबारी फक्त कागदच बोलतो, त्यामुळे कागदोपत्री तुम्ही कसे आहात हेच महत्त्वाचे असते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शाहजहाँपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा बँकेत आपले पैसे आणण्यासाठी गेले तेव्हा ते मृत असल्याचे सांगण्यात आले. बँक प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे पीडित शेतकऱ्याला चांगलाच धक्का बसला आहे. यासंदर्भात वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले असून पीडित शेतकऱ्याशी संवादही साधला आहे.
एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या वृत्ताने मला धक्काच बसला. कारण, बँकेकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये मला मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी माध्यमांत वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तिलहर येथील उपजिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात महसूल विभागाचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. त्यानुसार, २०२१ च्या तिलहर बीडीओंनी संबंधित शेतकऱ्याला मृत घोषित केले आहे.
UP: In Shahjahanpur, a case of an alive farmer being declared dead in official documents came to light
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 11, 2022
"We went to the bank to withdraw our money from sugarcane farming, there we got to know that we have been declared dead in official documents," said the victim farmer. (10.09) pic.twitter.com/lFsPCi1xsu
या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत सचिवाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यानंतर, या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानंतर, पीडित शेतकऱ्याला प्रमाणपत्रही देण्यात आले.