धक्कादायक! गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतच शहिदाच्या मुलीला धक्के मारत दाखवला बाहेरचा रस्ता
By वैभव देसाई | Published: December 1, 2017 08:34 PM2017-12-01T20:34:53+5:302017-12-01T21:39:17+5:30
गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही एक सभा घेतली होती. त्या सभेत चक्क शहिदाच्या मुलीसोबतच गैरवर्तन करण्यात आलं आहे.
अहमदाबाद- गुजरातमध्ये सध्या जोरदार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतायत. काँग्रेस आणि भाजपाकडून जागोजागी सभा घेतल्या जात आहेत. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही सभा घेतली होती. त्या सभेत चक्क शहिदाच्या मुलीसोबतच गैरवर्तन करण्यात आलं आहे.
नर्मदा जिल्ह्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सभेला संबोधित करत होते. त्याच वेळी एक मुलगी हातात कागद घेऊन मंचाच्या दिशेनं जात होती. परंतु मंचावर जाण्यापासून तिला सुरक्षारक्षकांनी रोखलं. त्यावेळी तिनं मी शहिदाची मुलगी आहे. मला मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भेटायचं आहे, असं सांगितलं. परंतु महिला पोलिसांनी तिला जमिनीवर पाडून जबरदस्त मारहाण केली आहे. पोलिसांनी तिचं काहीही न ऐकता महिला पोलिसांकरवी तिला धक्के मारत सभेबाहेर हाकलून दिलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं की सोडून दिलं याचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सभेत हा गैरप्रकार झाल्यामुळे सर्वच स्तरातून याचा निषेध केला जातोय. विशेष म्हणजे त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री विजय रुपाणी स्वतः भाषण ठोकत होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी याचा ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडीओही शेअर केला आहे. देशभक्त रुपाणीजींनी शहिदाच्या मुलीला सभेच्या बाहेर हाकलवून मानवतेला लाजवेल, असं कृत्य केलं आहे. 15 वर्षांपासून त्या शहिदाच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. फक्त पोकळ आश्वासनं दिली आहेत. न्याय मागणा-या या मुलीला आज अपमानही मिळाला, भाजपावाल्यांनो, जरा लाज बाळगा, राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर शरसंधान साधलं आहे.
भाजपा का घमंड अपने चरम पर है।
— Office of RG (@OfficeOfRG) December 1, 2017
‘परम देशभक्त’ रुपाणीजी ने शहीद की बेटी को सभा से बाहर फिंकवा कर मानवता को शर्मसार किया।
15 साल से परिवार को मदद नहीं मिली, खोखले वादे और दुत्कार मिली। इंसाफ़ माँग रही इस बेटी को आज अपमान भी मिला।
शर्म कीजिए,न्याय दीजिए। pic.twitter.com/w8k7TYQrDt
सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्र सरकराचे पूर्ण मंत्रिमंडळ भाजपाने रणांगणात उतरवलं आहे. भाजपाचे दिल्लीतील मुख्यालयही गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाने नेहमीच राज्य निवडणुका या युद्ध पातळीवरून लढविल्या आहेत, असा दावा सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी केला होता. परंतु इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत गुजरातच्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे. 18 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे अनेक नेते डोळे लावून बसले आहेत. भाजपातील वरुण गांधी, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, श्यामलाल गुप्ता आणि अन्य दोन बंडखोर विद्यमान खासदार गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. निकाल जर भाजपाच्या विरोधात गेला तर सध्याची राजकीय घडी विस्कटू शकते.