धक्कादायक! आईने नवजात मुलीला कुत्र्याच्या पिल्लांजवळ सोडले, कुत्रीने आपलं मूल समजून रात्रभर सांभाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:15 AM2021-12-19T09:15:40+5:302021-12-21T11:08:12+5:30
Chhattisgarh News: छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंगेली जिल्ह्यातील लोरमी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एक दिवसाच्या स्त्रीजातीच्या नवजात अर्भकाला कुणी अज्ञाताने गावातील आडोशाच्या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला फेकले.
रायपूर - छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंगेली जिल्ह्यातील लोरमी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एक दिवसाच्या स्त्रीजातीच्या नवजात अर्भकाला कुणी अज्ञाताने गावातील आडोशाच्या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला फेकले. मात्र या कुत्र्यांनी रात्रभर मुलीला काहीही न करता रात्रभर सांभाळले आणि पूर्णपणे सुरक्षित ठेवले. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.
ही घटना लोरमी ठाण्याच्या क्षेत्रातील सारीसताल गावात घडला आहे. ग्रामस्थांनी सकाळी एका बालकाला कुत्र्याच्या पिल्लांदरम्यान पाहिले. याची माहिती लोरमी पोलिसांनी दिली. याची माहिली मिळताच लोरमी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या नवजात अर्भकाला त्वरित मातृ शिशू रुग्णालयात पोहोचले. येथे नवजात मुलीवर प्राथमिक उपचार केले गेले. त्यानंतर चाइल्ड केअर मुंगेली येथे अधिक उपचारांसाठी पाठवले गेले.
याबाबत लोरमी पोलिसांनी सांगितले की, ग्रामस्थांनी सूचनेवर सारीसताल गावात एक नवजात अर्भक सापडले. हे बाळ केवळ एका दिवसाचे होते. उपचारांनंतर डॉक्टरांनी मुंगेली चाइल्ड केअर येथे अधिक उपचारांसाठी पाठवले. मात्र या प्रकरणात आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सध्या चौकशी सुरू आहे, त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल.
या प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षाने दिसली ती म्हणजे माणसांमधून माणुसकी संपत चालली असली तरी प्राणीमात्रांमध्ये मात्र मानवता दिसली आहे. रात्रभर ही अवघ्या एका दिवसाची मुलगी कुत्र्याच्या पिल्लांजवळ होती. त्यादरम्यान, कुत्र्याच्या पिल्लांची आईही तिथे आली असेल. मात्र तिने या बाळाला काहीही इजा केली नाही.