धक्कादायक ! हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी कापले जवानांचे गुप्तांग
By admin | Published: April 27, 2017 09:25 AM2017-04-27T09:25:10+5:302017-04-27T10:14:30+5:30
छत्तीसगड येथील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 27 - छत्तीसगड येथील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत. यातच आता समोर आलेली माहितीही खळबळजनक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी यातील काहींचे गुप्तांग कापले. सोमवारी करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यात 25 जवान शहीद झाले.
यानंतर, शहीद झालेल्या काही जवानांचे गुप्तांग कापण्यात आले आहे. ही धक्कादायक बाब घटनास्थळी शहिदांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेल्या बचाव पथकाच्या लक्षात आली. तर काहींचे चेहरे आणि डोके ठेचण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. शहीद जवानांच्या मृतदेहाची अशा प्रकारे विटंबना करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले की, शहीद झालेल्या काही जवानांचे अंग कापण्यात आले, एवढची माहिती सध्या आम्ही देऊ शकतो. दरम्यान, सुरक्षा दलासहीत स्थानिक आदिवासी नागरिकांना कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हे कुकृत्य केल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहाची कधीही विटंबना करत नाहीत. पण, सुरक्षा दलाकडून राबवण्यात येणा-या ऑपरेशदरम्यान कथित बलात्कार आणि छेडछाडीचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे याद्वारे स्थानिक आदिवासी नागरिकांनीही सुरक्षा रक्षकांना मदत करू नये, असा संदेश देण्यासाठी नक्षलवाद्यांनी कुकृत्याचं टोकं गाठले आहे.
असा भ्याड हल्ला करून नक्षलवादी सुरक्षा रक्षकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न करू पाहत असल्याचे एका अधिका-यानं सांगितले. यापूर्वीही नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारचे संतापजनक कृत्य केले होते. 2007मध्ये छत्तीसगड येथील बीजापूरमध्ये लष्करी छावणीवर हल्ला करत शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. या हल्ल्यात 55 जवान शहीद झाले होते.