खळबळजनक! हरयाणात INLDचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नफे सिंग यांची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:54 PM2024-02-25T23:54:01+5:302024-02-25T23:54:37+5:30
कमरेला आणि मानेला लागल्या गोळ्या, ३ सुरक्षारक्षक गंभीर जखमी
Nafe Singh Rathee shot dead: हरयाणात माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच पक्ष इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नफे सिंग राठी यांच्यासह चार जण हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही गोळ्या लागल्या. जखमी अवस्थेत नफे सिंग राठी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ते माजी आमदारही होते. इंडियन नॅशनल लोक दलाने त्यांच्या मृत्यूला वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना बाराही गेटजवळ घडली. हल्लेखोर आय-10 वाहनातून आले होते. नफे सिंग यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सर्वांना गंभीर अवस्थेत ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच नफे सिंग राठी यांचा मृत्यू झाला.
Confirming to ANI, Haryana INLD leader Abhay Chautala says, "He (Nafe Singh Rathee) has died. One of our party workers was with him, he has also died." https://t.co/1IFhpfkQeb
— ANI (@ANI) February 25, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, INLD प्रदेशाध्यक्ष नफे सिंग यांच्यावर झालेला हल्ला हा सुनियोजित हल्ला होता. या गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा पोलिसांना संशय आहे. कारमधून आलेल्या काही हल्लेखोरांनी राठी आणि त्यांच्या तीन बंदूकधारी सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या पुढील सीटवर बसलेले राठी आणि त्यांचे तीन बंदूकधारी गोळीबारात जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर त्यांच्या कारमध्ये बसून फरार झाले.
INLD च्या मीडिया सेलचे प्रभारी राकेश सिहाग यांनी नफे सिंग राठी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. राठी यांच्या कमरेला आणि मानेला गोळ्या लागल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी राठी त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते, तर हल्लेखोर आय-20 कारमधून आले होते. झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हे अन्वेषण एजन्सी (सीआयए) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) तैनात करण्यात आले आहेत. या घटनेमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी कला जाठेदी यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेचा वाद हा हत्येमागे असल्याचे बोलले जात आहे.