धक्कादायक! विमा रकमेसाठी स्वत:च्याच खुनाची दिली सुपारी; राजस्थानातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:53 AM2019-09-11T03:53:35+5:302019-09-11T06:33:44+5:30

: पोलीस तपासातून धक्कादायक माहिती उघड; निर्जनस्थळी मिळाला मृतदेह

Shocking! Offer your own murder victim for insurance money | धक्कादायक! विमा रकमेसाठी स्वत:च्याच खुनाची दिली सुपारी; राजस्थानातील घटना

धक्कादायक! विमा रकमेसाठी स्वत:च्याच खुनाची दिली सुपारी; राजस्थानातील घटना

Next

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या नावे काढलेल्या विम्याची रक्कम कुटुंबियांस मिळावी यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन गेल्या आठवड्यात स्वत:चाच खून करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासातून उघड झाला आहे.

या मुलखावेगळ्या इसमाचे नाव बलबीर असून, त्याचा मृतदेह भिलवाडा जिल्ह्यातील मांगरोप गावात एका निर्जन ठिकाणी मिळाला. त्याचे हात-पाय दोरीने बांधलेले होते व गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी बलबीरच्या खुनाच्या आरोपावरून सुनील यादव आणि राजवीर या दोन आरोपींना अटक केली. हे दोघेही उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्या जबानीतून बलबीरने स्वत:च सुपारी देऊन आपला खून करून घेतला, असे उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बलबीरच्या कुटुंबियांनी मात्र खुनाची सुपारी दिली जाणे किंवा बलबीरने उतरविलेला विमा याचा इन्कार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बलबीरने आपला खून करण्यासाठी ८० हजार रुपये दिले. एवढेच नव्हे तर आपला खून कसा व कुठे केला जावा हेही त्यानेच ठरविले व तोच त्याठिकाणी घेऊन गेला, असे आरोपींनी जबानीत सांगितले.

आरोपींच्या या म्हणण्यात कितपत विश्वास ठेवावा हे तपासण्यासाठी पोलिसांनी गावात चौकशी केली असता असे कळले की, बलबीरने गेल्या वर्षभरात लोकांकडून २० लाख रुपये उसने घेऊन ती रक्कम इतरांना चढ्या व्याजाने कर्जाऊ दिली होती; पण या व्यवहारांतून गेल्या सहा महिन्यांत त्याला काहीच कमाई झाली नाही. पैसे उसने दिलेले लोक बलबीरकडे तगादा लावू लागले व त्याने ज्यांना पैसे व्याजाने दिले होते ते परतफेड करण्याचे टाळू लागले. 

८.४३ लाख रुपये हप्ता भरून स्वत:चा ५० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला
पोलिसांच्या म्हणण्यानुसार या दुहेरी कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या रकमेचा विमा उतरवून आयुष्य संपविण्याची भन्नाट योजना त्याच्या डोक्यात शिजली. त्यानुसार त्याने ८.४३ लाख रुपये हप्ता भरून स्वत:चा ५० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला; पण आत्महत्या केली तर विम्याची रक्कम मिळणार नाही, असे त्याला जाणकारांनी सांगितले. म्हणून त्याने मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन त्यांच्याकरवी आपला खून करून घेण्याची शक्कल लढविली. यामुळे ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले त्यांचा तगादाही संपेल व आपण नसलो तरी विम्याची रक्कम मिळून कुटुंबाचा चरितार्थ आरामात चालू शकेल, अशी यामागची त्याची कल्पना असावी.

Web Title: Shocking! Offer your own murder victim for insurance money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.