धक्कादायक! ओला कॅबमध्ये महिलेला ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार, 6 संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 01:01 PM2018-04-27T13:01:04+5:302018-04-27T13:01:04+5:30
ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली- ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. सुरजपूर येथे जाण्यासाठी त्या महिलेनं सेक्टर 37 येथून कॅब बुक केली होती. कॅबमध्ये महिला बसल्यानंतर काही वेळानं कॅबचालकाचे मित्रही कॅबमध्ये बसले आणि त्यांनी महिलेला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्या ओला कॅब चालकानं स्वतःच्या साथीदाराबरोबर मिळून त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
या प्रकरणात पोलिसांनी कॅबचालकाच्या भावासह 6 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार कोतवाली भागातील दयानगर येथे घडला आहे. पीडित महिलेनं सांगितलं की, कॅबचालक आणि त्याच्याबरोबर कॅबमध्ये असलेल्या लोकांनी मला दारू पाजण्याचा प्रयत्न केला, पण मी विरोध केल्यानंतर त्या कॅबचालकानं दयानगर गावाजवळील जंगलात जाऊन गाडी थांबवली. तिथेच तिच्यावर कॅबचालक आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत महिला दयानगर गावात दाखल झाली. त्यानंतर गावक-यांनी तिला मदत केली. महिलेनं फोन करून पोलिसांना बोलावलं आणि सर्व प्रकार सांगितला. सध्या कॅबचालक हा मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांनी आरोपीचे काका आणि भावासह 6 लोकांना ताब्यात घेतलं असून, महिलेला मेडिकल तपासणीसाठी पाठवलं आहे.
तर मंगळवारी(24 एप्रिल)ला ग्रेटर नोएडातल्या एका नावाजलेल्या खासगी शाळेत 11वीच्या विद्यार्थिनीवरही चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. विद्यार्थिनीला 3 तरुणांनी धावत्या कारमध्ये ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींमध्ये एक मुलगा तिच्या वर्गातील असून, तर आरोपी त्याचे नातेवाईक आहेत.