धक्कादायक ! 14 ते 18 वर्षे वयोगटातील एक चतुर्थांश मुलांना धडपणे वाचता येत नाही मातृभाषेतील मजकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 08:41 PM2018-01-16T20:41:52+5:302018-01-16T21:22:43+5:30
आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि 14 ते 18 वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात मुले मोबाइल फोन व्यवस्थित वापरता येतो.
नवी दिल्ली - आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि 14 ते 18 वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात मुले मोबाइल फोन व्यवस्थित वापरता येतो. मात्र या दहा मुलांपैकी एक चतुर्थांश मुलांना आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचता येत नाही, असा निष्कर्ष अॅन्युएल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर)च्या 2017च्या अहवालात काढण्यात आला आहे.
देशातल्या 24 राज्यांतील 24 जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी 35 संस्थांच्या मदतीने 1641 गावांतील 25 हजार घरांना सर्वेक्षणासाठी भेटी दिल्या व 30 हजार मुलामुलींशी त्यांनी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. ही मुले काय करतात, त्यांची क्षमता, जागरुकता, त्यांची ध्येय अशा चार मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आले. असर अहवाल 2017 हा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कसा बोजवारा उडालेला आहे हे असर 2017च्या अहवालातील निष्कर्षांनी दाखवून दिले आहे.
वयाच्या 14व्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी न झालेल्या मुलांची संख्या 5 टक्के आहे. तर 18 वर्षांच्या मुलांचे याबाबतीतले प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 हा अमलात आल्यानंतरच्या लगेचच जी मुले आठवी इयत्ता उत्तीर्ण झाली अशा 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत हा अहवाल भाष्य करतो. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असे शिक्षण हक्क कायद्यामध्ये म्हटले आहे.
असर 2017च्या अहवालात म्हटले आहे की, 14 ते 18 वर्षे वयोगटातील 25 टक्के मुले आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचू शकत नाहीत. 14 वर्षे वयोगटातील 53 टक्के मुले इंग्रजी वाक्ये वाचू शकतात. 14 वर्षे असो किंवा 18 वर्षे वयोगटातील मुलांना गणिताचे सामान्य ज्ञानही नसते. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना वित्तसंस्था, प्रसारमाध्यमे, डिजिटल वर्ल्ड याविषयी किती माहिती असते याची पडताळणी केली असता त्यातील 73 टक्के मुलांनी मोबाइल फोनचा व्यवस्थित वापर केल्याचेही आढळून आले. मात्र 12 टक्के मुलांनी मोबाइल आजवर कधीच वापरलेला नाही तर मुलींमध्ये हेच प्रमाण 23 टक्के इतके आहे.