धक्कादायक! परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 07:20 AM2022-09-12T07:20:09+5:302022-09-12T07:20:30+5:30
मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराय जिल्ह्यांतल्या महाविद्यालयांत बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओळखपत्रे देताना हा अजब प्रकार घडला आहे.
पाटणा : बिहारमधील ललितनारायण मिथिला विद्यापीठाने परीक्षार्थींना दिलेल्या ओळखपत्रांपैकी काहींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रख्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची छायाचित्रे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांनीच हा खोडसाळपणा केला असावा असा संशय आहे.
मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराय जिल्ह्यांतल्या महाविद्यालयांत बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओळखपत्रे देताना हा अजब प्रकार घडला आहे. ललितनारायण मिथिला विद्यापीठाचे मुख्यालय दरभंगा येथे आहे. त्या विद्यापीठाचे रजिस्ट्रार मुश्ताक अहमद यांनी सांगितले की, परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान व अन्य मान्यवरांची छायाचित्रे कशी झळकली याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून परीक्षार्थींना ओळखपत्रे जारी करण्यात येते तसेच त्यांना विशिष्ट लॉगइन दिले जाते. त्या प्रक्रियेतच काही विद्यार्थ्यांनी स्वत:ऐवजी पंतप्रधानांसहित काही मान्यवरांची छायाचित्रे ओळखपत्रांवर झळकविण्याचा खोडसाळपणा केला असण्याची शक्यता आहे. अशी गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही मुश्ताक अहमद म्हणाले.
आई सनी लिओनी, वडील इमरान हाश्मी
काही वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर येथे एका विद्यार्थ्याने आपल्या परीक्षा ओळखपत्रावर आई व वडिलांचे नाव अनुक्रमे इमरान हाश्मी व सनी लिओनी असे लिहिले होते. त्यावेळी देखील खूप गदारोळ झाला होता.